भटक्यांची झाडूची ‘फॅक्टरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 04:26 PM2019-05-26T16:26:01+5:302019-05-26T16:26:16+5:30
कष्टाला कौशल्याची जोड देत छत्तीसगड येथील एका भटक्या समूहाने उघड्यावरच झाडू निर्मितीला सुरुवात केली आहे.
अकोला : रखरखत्या उन्हात डोक्यावर छत नाही; पण संसाराचा गाडा चालविण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. याच कष्टाला कौशल्याची जोड देत छत्तीसगड येथील एका भटक्या समूहाने उघड्यावरच झाडू निर्मितीला सुरुवात केली आहे. भटक्यांची ही ‘फॅक्टरी’ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शिक्षण असूनही रोजगार नाही म्हणून अनेकजण बेरोजगार म्हणून भटकत आहेत; पण याच भटक्यांच्या गर्दीत असाही एक भटका समूह आहे, जो जागा भेटेल तिथे बिºहाड मांडून कष्टाने संसाराचा गाडा चालवित आहे. अशाच एका भटक्या समूहाने अकोल्यातील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बिºहाड मांडले आहे. या बिºहाडात ३० ते ३५ कुटुंबांचा समावेश असून, हा समूह मूळ छत्तीसगड येथील आहे. आपल्या कला-कौशल्यातून झाडू निर्मिती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय. छत्तीसगड येथून खजुराची पाने आयात करून त्यापासून झाडू निर्मिती करणे अन् त्यांची बाजारपेठेत विक्री करून ते संसाराचा गाडा चालवित आहेत. या बिºहाडात महिलांसह काही चिमुकली मुलेही वास्तव्यास आहेत. पुरुष मंडळी झाडूंच्या विक्रीसाठी बिºहाडातून बाहेर पडल्यावर या महिला मुलांचा सांभाळ करीत झाडूंची निर्मिती करण्यात व्यस्त राहतात; मात्र जन्मजात मिळालेल्या गरिबीनंतरही आईकडून मिळालेल्या मायेच्या सावलीमुळे या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. आई-वडिलांसोबतच मुलांच्या नशिबीही कष्टच; पण या कष्टाच्या छायेत त्यांना मिळणारी आईची माया जगण्याची श्रीमंती देऊन जात आहे.
चिमुकल्यांना गरज शिक्षणाची
कष्टकरी आई-वडिलांच्या मायेसोबतच या चिमुकल्यांना शिक्षणाची गरज आहे. गत वर्षभरापासून एकाच ठिकाणी वास्तव्यास असलेल्या या कुटुंबाकडे मात्र शिक्षण विभागाची शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम फिरकलीच नाही. शिवाय, सामाजिक संघटनांचेही या चिमुकल्यांकडे दुर्लक्षच आहे. अशा परिस्थितीत सामाजिक संघटनांसह शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा विडा उचलण्याची गरज आहे.