'वॉर्ड बॉय ते 1000 कोटींचा मालक' झालेला तरुण सांगतोय, 'कोण होऊ शकतं बिझनेसमन'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:36 PM2019-09-10T13:36:39+5:302019-09-10T14:50:08+5:30
मिळेल ते काम करा आणि पुढे जात चला प्रतिपादन प्रथितयश उद्योजक राहुल नार्वेकर यांनी प्रेरणादायी व्याख्यान करताना केले.
अकोला: उद्योगधंदा सुरू करायला पैसे नाही तर आयडिया पाहिजे आणि ती आयडिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यासाठी तयार राहा. अपयश ही यशाची नांदी असते. त्यावर मात करून जाण्याची कुवत प्रत्येकात असतेच. मिळेल ते काम करा आणि पुढे जात चला प्रतिपादन प्रथितयश उद्योजक राहुल नार्वेकर यांनी प्रेरणादायी व्याख्यान करताना केले.
श्री शिवाजी महाविद्यालय व संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदेमार्फत आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेला विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादात सोमवारी दिमाखदार सुरुवात झाली. राहुल नार्वेकर यांचा जीवनप्रवास एक वॉर्ड बॉय ते १ हजार कोटीचे मालक असा आहे. ते म्हणाले की, एकदा अपयश आले की आपण त्या कामाकडे, व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो आणि आयुष्यभर एका अपयशाची मनाशी गाठ बांधून पुन्हा कोणतेही काम करण्याची हिंमत करत नाही; मात्र प्रत्येक विद्यार्थ्याने, उद्योजक व व्यापाऱ्याने एका अपयशाने खचून न जाता पुन्हा त्याच जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. जीवनात संघर्ष अटळ असून, त्याला घाबरू नका आणि अपयशाच्या भीतीने सुरुवातीलाच खचून जाऊ नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. आत्महत्येचा विचारही करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, असे त्यांनी युवकांना आश्वासित केले. या पुढे युवक व महिलांनी चांगले प्रोजेक्ट आणल्यास त्यांना स्टार्टअपसाठी पूर्ण सहकार्य करू, असेही यावेळी नार्वेकर म्हणाले. विद्यार्थ्यांनी या वेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आर. इंगळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. अनिल राऊत आणि डॉ. आशीष राऊत हे विचार मंचावर उपस्थित होते. राहुल नार्वेकर आणि सोनिया खुराणा यांचे स्वागत महाविद्यालयामार्फत करण्यात आले तर आभार प्रदर्शन आणि संचालन प्रा. संगीता शेगोकार यांनी केले. या प्रसंगी नवउद्योजक आशीष चौखडे व काही निवडक विद्यार्थ्यांचादेखील यांचा सत्कार करण्यात आला.