पाच नगरसेवकांच्या लढतीने प्रभाग १२ झाला प्रतिष्ठेचा
By admin | Published: February 7, 2017 03:21 AM2017-02-07T03:21:28+5:302017-02-07T03:21:28+5:30
तीन मुरब्बी नगरसेवक रिंगणात; राजकीय पक्षांचे विशेष लक्ष
अकोला, दि. ६- मदन भरगड, उषा विरक, हरीश आलिमचंदानी या तीन मुरब्बी आणि अजय शर्मा, राजेश्वरी शर्मा या दोन युवा नगरसेवकांच्या लढतीने अकोला महापालिका प्रभाग क्रमांक १२ सर्वंंच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. या प्रभागातील चारही प्रवर्गात वेगवेगळ्य़ा पक्षांचे उमेदवार वजनदार ठरत असल्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष येथे केंद्रित झाले आहे. अकोला महापालिकेत सलग तिसर्यांदा निवडून आलेले नगरसेवक रिंगणात असलेला हा प्रभाग आहे. तिघांच्याही कामाची छाप मतदारांवर आणि महापालिकेवर आहे. त्यात दोन युवा नगरसेवक याच प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. पाच विद्यमान नगरसेवक आणि ११ नवीन चेहरे निवडणूक मैदानात उतरलेले आहेत. पाच नगरसेवक लढतीत असलेला एकमेव प्रभाग महापालिकेत एकच असल्याने सर्वच पक्षांच्या दृष्टीने हा प्रभाग प्रतिष्ठेचा झाला आहे.खुला पुरुष प्रवर्गात काँग्रेसचे ज्येष्ठ आणि भाजपचे युवा नगरसेवक थेट अमोरा- समोर आहेत. महिला प्रवर्गात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आणि शिवसेनेच्या तरूण नगरसेविका थेट अमोरा-समोर लढत देणार आहेत. त्यामुळे कोणत्याही दोन नगरसेवकांना लढतीत पराभव पत्करावा लागणार आहे, तसेच ज्या नगरसेवकाने मागे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती, ते उमेदवार यंदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मागिल निवडणुकीत ज्या महिला उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर होत्या, त्या यंदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर काँग्रेसच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. भाजपच्या तिकिटावर ज्यांनी मागे विजयापर्यंंत धाव घेतली होती, त्या उमेदवारही या भाऊगर्दीत निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक लक्षवेधी झाली आहे. या प्रभागातून निवडून येणारे दोन दिग्गज नगरसेवक महापौरपदाचे दावेदारही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांचा जोर या प्रभागात लागणार आहे.या प्रभागात इराणी वसाहत, मंगलवारा आणि बसस्टॅण्ड मागील आंबेडकर नगरातील वसाहतीचे गठ्ठा मत कोणाच्या पक्षांकडे झुकतात, त्यावर या प्रभागातील विजयाचे चित्र अवलंबून आहे.