एनसीडीईएक्सच्या टीमकडून वेअरहाऊसची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 04:27 PM2019-12-29T16:27:24+5:302019-12-29T16:27:29+5:30
सर्व बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शनिवारी एनसीडीईएक्सची टीम अकोल्यात येऊन गेली.
अकोला : मोठ्या प्रमाणात होत असलेला ऋतूबदल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतारामुळे जबर फटके बसत आहे. सोबतच पीक साठवणूक आणि पीक दर्जासंदर्भात गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या सर्व बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शनिवारी एनसीडीईएक्सची टीम अकोल्यात येऊन गेली. या पथकाने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील गोडावूनला भेटी दिल्यात. सोबतच अकोल्यातील मूर्तिजापूर मार्गावरील एनसीएमएलच्या गोडावूनला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कमोडिटी मार्केटमधील आरोप आणि वस्तुस्थिती निहारण्यासाठी दिल्ली, मुंबईसह अकोल्यातील पदाधिकारी या पाहणीत प्रामुख्याने सहभागी झाले होते.
बाजारपेठेतील साठविलेले सोयाबीन आणि सरकी ढेपीची व्यवस्था निहाळली गेली. शासनाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी किती प्रमाणात होत आहे याचा आढावादेखील याप्रसंगी घेण्यात आला. एनसीडीईएक्समध्ये असलेल्या पीक साठवणीची विस्तारपूर्वक माहिती देण्यात आली. गुंतवणूकदारांचे अधिकार आणि नियम यावरही येथे जाहीर चर्चा करण्यात आली. सोबतच अकोल्यातील एनसीडीईएक्सच्या वेअर हाऊसेसमध्ये असलेल्या १८ हजार मेट्रिक टन साठ्याची माहितीदेखील येथे देण्यात आली. नाबार्ड, शासन आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थांची देखरेख यावर कशी राहते, याची माहितीही आणि उपस्थित प्रश्नाची उत्तरे येथे देण्यात आली.