वारकरी संप्रदाय ही क्रांतिकारी चळवळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:06 AM2017-09-04T02:06:11+5:302017-09-04T02:07:35+5:30
अकोला: सातशे वर्षांपूर्वी समाजाला बसत असलेले चातुर्वण्र्य अन् विषमतेचे चटके कमी करण्याचे काम करून वेदप्रामाण्य नाकारणारा वारकरी संप्रदाय ही खरी क्रांतिकारी चळवळ होती, असे प्रतिपादन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी रविवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सातशे वर्षांपूर्वी समाजाला बसत असलेले चातुर्वण्र्य अन् विषमतेचे चटके कमी करण्याचे काम करून वेदप्रामाण्य नाकारणारा वारकरी संप्रदाय ही खरी क्रांतिकारी चळवळ होती, असे प्रतिपादन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी रविवारी येथे केले.
येथील साईकृपा मंगल कार्यालयात तीन दिवस सुरू असलेल्या सखोल प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्रात ‘संत आणि चमत्कार’ या विषयावर प्रा. मानव बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. महेंद्र काळे, डॉ. राऊत उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर हे पहिले बंडखोर संत होते; मात्र त्यांच्या नावावर चमत्कार खपविण्यात आलेत. वास्तविक कोणत्याही संताने चमत्कार केले नाहीत. उलट चमत्कार, सिद्धी, दैवी शक्ती, मंत्र-तंत्र कसे खोटे असतात, हे अभंगातून मांडले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अतिभक्तीपोटी चरित्र किंवा पोथी लेखकांनी संतांच्या नावावर चमत्कार घुसडले. गाडगेबाबांच्या अंत्ययात्रेत उपस्थित असणारे लोक आजही जिवंत असताना, गाडगेबाबा तुकारामाचे अवतार होते अन् ते सदेह वैकुंठाला गेले, असे बडनेर्याच्या उमाळे गुरुजींनी पोथीत लिहिले आहे. गाडगेबाबाबाबत जर असे होत असेल तर ७00 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या चरित्रात किती घोळ झाले असतील, हे लक्षात घ्यायला हवे, असेही आवाहन प्रा. मानव यांनी यावेळी केले. यावेळी शरद वानखडे, पुरुषोत्तम आवारे, अशोक घाटे, संध्या देशमुख, चंद्रकांत झटाले, मंगेश वानखडे, विजय बुरकुले, धम्मदीप इंगळे, संतोष ताले, दिगंबर सांगळे, रुपाली राऊत, किशोर वाघ, प्रतिभा भुतेकर, अँड. शेषराव गव्हाळे, विठ्ठल तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्रद्धा डोळस हवी!
आमचा देव, धर्माला विरोध नाही. कुणाला डोळस श्रद्धा ठेवायची असेल तर माझी हरकत नाही कारण डोळस होणे याचाच अर्थ तर्क, चिकित्सा वापरायला सुरुवात करणे, समाजाची तर्कबुद्धी जागृत करणे एवढेच अंनिसचे काम आहे. हे काम लोकांना कमीत कमी दुखावूनसुद्धा अतिशय प्रभावीपणे करता येते, असेही प्रा. मानव यावेळी म्हणाले.