सर्वधर्म समभाव, व्यापक विचारसरणीचा वारकरी संप्रदाय - डॉ. जलाल महाराज सैयद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 05:55 PM2020-02-01T17:55:17+5:302020-02-01T17:55:22+5:30
श्री १00८ महामंडलेश्वर डॉ. जलाल महाराज सैयद अकोल्यातील कौलखेडमध्ये सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्याशी साधलेला संवाद...
- नितीन गव्हाळे
अकोला: वारकरी संप्रदाय व्यापक आहे. सर्व धर्म ग्रंथांना मानणारा अनुसरून आणि व्यापक विचारसरणीचा हा एकमेव संप्रदाय आहे. सर्वांना सामावून घेत, विवेकवादी विचारधारा जपणारा हा संप्रदाय आहे. काळानुरूप संप्रदायामध्ये, कीर्तनामध्ये मोठे बदल होत आहेत. असे श्री १00८ महामंडलेश्वर डॉ. जलाल महाराज सैयद(कारंजीकर जि. नाशिक) यांनी सांगितले. अकोल्यातील कौलखेडमध्ये सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्याशी साधलेला संवाद...
तुम्ही वारकरी संप्रदायाशी कसे जुळले?
मुस्लिम कुटूंबात जन्माला आलो असलो तरी, एक माणूस म्हणून कार्य करावे आणि माझ्या तीन पिढ्या वारकरी संप्रदायाच्या जुळलेल्या. पणजोबा एकतारी भजन करायचे. वडीलही भजन करायचे. त्यामुळे तो संस्कार माझ्यावर झाला आणि मी वारकरी संप्रदायाकडे जुळलो. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर आणि परदेशात सुद्धा कीर्तन करायला जातो. वारकरी संप्रदाय हा सर्वधर्म ग्रंथांना अनुसरून आहे. माणूस जन्माला आलो तर एक माणूस म्हणूनच आपण जगलो पाहिजे. समाजातील वेदना, दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कीर्तनामध्ये काय बदल होत आहेत. ?
काळानुरूप कीर्तनाची परंपरा सुद्धा बदलत आहे. आतातर कीर्तन परंपरेने गरूडझेप घेतली आहे. श्रोत्यांनी कीर्तनकार म्हणून स्विकारताना, त्याच्या लोकप्रियतेवर न जाता, त्याच्याकडे किती ज्ञानसंपन्नता आहे. त्याची आचरण प्रतिभा कशी आहे. हे पाहून, कीर्तनकाराला स्विकारले पाहिजे. कीर्तन हे मनोरंजनाचे साधन नाही तर ते समाज प्रबोधन आहे. कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य होत आहे.
तुम्ही कोणत्या विषयावर विचार प्रबंध लिहिला, त्याविषयी सांगा?
मी रामायण ग्रंथावर विचार प्रबंध लिहिला. या विषयावरच मला विद्यापीठाने आचार्य पदवी मिळाली आहे. नुकतेच मला श्री १00८ महामंडलेश्वर पदवी सन्मानित केले आहे.
एक मुस्लिम कीर्तनकार म्हणून समाज कसा पाहतो?
मुस्लिम कीर्तनकार म्हणूक कीर्तन करताना, लोकांना फार अप्रूप वाटत नाही. जात, धर्म बाजुला ठेऊन एक माणूस म्हणून म्हणून हे कार्य करतो. मी जे करतो आहे. ते प्रचलित परंपरेच्या विरोधात आहे. त्यामुळे अनेकदा त्रासही सहन करावा लागतो. समाजाने संत शिरोमणी तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वरांना सोडलं नाही. परंतु जिथेही कीर्तन करायला जातो. लोक भरभरून प्रेम देतात. जगाचा विचार न करता, काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. भविष्यात अनाश्र आश्रम, आदिवासी पाड्यांमधील मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शाळा, वसतिगृह सुरू करण्याचा मानस आहे.
कीर्तनातून कीर्तनच मांडल्या गेल्या पाहिजे. त्यात वैचारिक अतिक्रमणं आली की त्रास होतो. वारकरी संप्रदायात कोणत्याही वैचारिक भुमिकेला स्थान नाही.