सावधान : पंधरा दिवसांत आढळले डेंग्यूचे आणखी ३ रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:45+5:302021-09-17T04:23:45+5:30
जिल्ह्यात व्हायरल तापीने थैमान घातले असून, बहुतांश रुग्ण डेंग्यूसदृश असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूच्या पाच रुग्णांची ...
जिल्ह्यात व्हायरल तापीने थैमान घातले असून, बहुतांश रुग्ण डेंग्यूसदृश असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूच्या पाच रुग्णांची नोंद करण्यात आली होती. शासगी रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयातही डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. अमरावती जिल्ह्याच्या तुलनेत अकोल्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली, तरी ती कासवगतीने वाढत आहे. त्यामुळे अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूच्या आठ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील तीन रुग्णांची नोंद मागील १५ दिवसांत करण्यात आली आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी महापालिका क्षेत्रात डेंग्यू रुग्णांची नियमित नोंद होत नसल्याने खासगी रुग्णालयातील बहुतांश रुग्णांवर डेंग्यूसदृश म्हणूनच उपचार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांची खरी संख्या कळणे कठीण झाले आहे.
रोज किमान २५ रुग्ण
जिल्ह्यात व्हायरल तापीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यातील दररोज किमान २५ रुग्णांना डेंग्यूची लक्षणे आढळून येतात. खासगी रुग्णआलयामध्ये दाखल अशा डेंग्यूसदृश रुग्णांची कार्ड टेस्ट केली जाते. खासगी रुग्णालयात या रुग्णांवर डेंग्यूसदृश म्हणूनच उपचार केला जात असल्याची माहिती आहे.
लहान मुलांमध्ये प्रमाण जास्त
रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. यातील बहुतांश मुलांना डेंग्यू, मलेरियाचे लक्षणे दिसून येत आहे. अशा बाल रुग्णांवर शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालये देखील हाऊसफुल्ल झाले आहेत.
अशी आहे रुग्णसंख्या
डेंग्यू - ८
चिकुनगुनिया - १
काय आहेत लक्षणे?
डेंग्यू - तीव्र ताप येणे व डोके दुखणे, सांधे व अंगदुखी, अंगावर लालसर व्रण वा पुरळ येणे, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे, रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे
चिकुनगुनिया - या आजारातील तापीचे लक्षणे सामान्य तापाच्या तुलनेत भिन्न असतात. तापीसोबतच तीव्र सांध्यांच्या वेदना असतात. या व्यतिरिक्त, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा देखील सामान्य लक्षणे आहेत.
काविळ - त्वचा, डोळे पिवळे होणे, मुत्राचा रंग अधिक पिवळा होतो, शौचाचा रंग हलका होणे. पोटदुखी, अतिथकवा, उलटी, खाज येणे, झोपमोड होणे इत्यादी.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत डेंग्यूच्या ५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात आणखी ३ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने डेंग्यूच्या एकूण रुग्णांची संख्या ८ वर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रातील डेंग्यूच्या स्थितीची आकडेवारी अद्याप आलेली नाही.
- डॉ. आदित्य महानकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अकाेला