मुसळधार पावसाचा इशारा; हरभरा पेरणीची घाई नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 10:43 AM2020-10-09T10:43:39+5:302020-10-09T10:44:02+5:30
Agriculture News, Akola हरभरा पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यात ९ ते १६ आॅक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार असून, शेतकऱ्यांनी उभ्या पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात, तसेच हरभरा पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.
राज्यभरातील शेतकरी सोयाबीन, मूग काढणीला लागले आहेत. तर काही भागात शेतकरी हरभरा, करडई, मोहरी, जवस पेरणीच्या तयारीत आहेत; मात्र बँकॉक- थायलंड समुद्र किनारपट्टीजवळ चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ अंदमानच्या निल्लूर किनाºयाकडे प्रवास भारतीय किनारपट्टीवर धडकणार आहे.
त्यामुळे तेलंगणासह महाराष्ट्रातही पावसाचे वातावरण तयार झाले असून, राज्यात ९ ते १६ आॅक्टोबर या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेती पिकांना बसणार आहे.
त्यामुळे शेतातील सोयाबीन, उडीद, मुगाच्या पिकांसह इतर पिकांचे पावसापासून रक्षण करण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना केले जात आहे. यासोबतच हरभºयासह करडई, मोहरी, जवस पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये, असेही आवाहन केले जात आहे.
बियाण्यांची उगवण क्षमता धोक्यात!
खरिपातील पीक काढणीसोबतच शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणीची तयारी करत आहेत; मात्र रब्बी हंगामात ऐन पेरणीच्या काळात पाऊस झाल्यास पेरलेल्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकºयांनी हरभरा पेरणीची घाई न करता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी.
राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील विविध भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात २५ ते ३० मिमी., मराठवाड्यात २० ते ५० मिमी., कोकण विभागात ३० ते ५४ मिमी. तसेच पश्चिम महाराष्ट्रात २० ते ८० मिमी. पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र जळगाव वगळता इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही.
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे.
राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकºयानी सोयाबीनसह इतर उभ्या पिकांचे संरक्षण करावे, तसेच हरभºयासह इतर पिकांच्या पेरणीची घाई करू नये.
- डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, पीडीकेव्ही, अकोला.