वाशिम: १३ महिन्यात अपघाताचे ११२ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:54 PM2020-02-19T12:54:30+5:302020-02-19T12:54:42+5:30
गत १३ महिन्यात जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या २६१ घटनांमध्ये ११० जण ठार; तर २०९ जण जखमी झाले आहेत.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नादुरूस्त वाहने, भरधाव वेग, दिवसेंदिवस वाढती रहदारी, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना हेल्मेट वाहन चालविणे, पूर्ण झोप न घेणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदींमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात रस्ते अपघातात माहेवारी दहाजण ठार होतात. हा विषय चिंतेचा बनत असून यामुळे अनेकांचे कुटूंब उध्वस्त होत आहे. गत १३ महिन्यात जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या २६१ घटनांमध्ये ११० जण ठार; तर २०९ जण जखमी झाले आहेत.
वाशिम जिल्ह्याच्या चारही सिमेला अकोला, बुलडाणा, हिंगोली आणि अमरावती, यवतमाळ हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमधून दैनंदिन वाशिममार्गे वाहने भरधाव वेगाने धावतात. विशेषत: जडवाहतूक करणाऱ्या वाहनांचा त्यात अधिक प्रमाणात समावेश आहे. अशातच वाशिमसह जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा आणि मंगरूळपीर या सहाही शहरांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा लागणाºया हातगाड्या, पार्किंग नसतानाही अस्ताव्यस्त स्वरूपात उभी केली जाणारी वाहनांमुळे वाहतूक वारंवार विस्कळित होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. वाहतूक सुरळित करण्याची जबाबदारी वाहतूक विभागाची आहे; परंतु हा विभाग कारवाईस टाळाटाळ करित असल्याचे दिसून येत आहे.
सीटबेल्ट, हेल्मेट सक्तीचे होतेय उल्लंघन
रस्त्यांवरील अपघातांमध्ये प्रामुख्याने डोक्याला दुखापत होऊन मृत्यू ओढवण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ते कमी करण्यासाठी साधारणत: दोन वर्षांपूर्वी चारचाकी वाहनधारकांना सीटबेल्ट बांधणे व दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले. त्यानुसार, जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा वाहतूक, शहर वाहतूक विभाग तथा पोलिस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम राबवून अनेकांवर दंडात्मक कारवाई केली होती; मात्र गत अनेक महिन्यांपासून ही मोहीम पूर्णत: थंडावली आहे.
दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करायलाच हवा. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये. स्वत:चा जीव सुरक्षित राहावा, यासाठी किमान वाहतूक नियमांचे पालन प्रत्येकाने करायला हवे.
- राजू वाटाणे
निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. प्रश्न जीवाचा असल्याने वाहनधारकांनी देखील वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. रस्ते सुरक्षिततेसंदर्भात पोलीस विभागातर्फे चालकांना मार्गदर्शन केले जाते.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम