स्वच्छतेसाठी २९ काेटींची उधळपट्टी; तरीही शहरात घाणीचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 10:42 AM2020-11-29T10:42:48+5:302020-11-29T10:44:56+5:30
Akola Municipal corportation News तब्बल २९ कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना शहरात घाणीची समस्या कायम
अकाेला: मनपा प्रशासनाच्यावतीने शहरात स्वच्छता राखण्याचा गवगवा केला जात असतानाच ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या गल्लीबोळांसह बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. साफसफाईच्या मुद्यावर कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी तब्बल २९ कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना शहरात घाणीची समस्या कायम असल्याने काेराेनाच्या संकटात हिवाळ्यात साथ राेगांचा फैलाव झाल्याचे चित्र समाेर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल सत्ताधारी भाजपने घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संसर्गजन्य कोरोनाविषाणूची साथ अद्याप कायम असून, शहरातील अस्वच्छता व घाणीमुळे साथीच्या आजारांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत २,०१४ पासून केंद्र व राज्य शासनाकडून मनपा प्रशासनाला स्वच्छतेच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होत आहे. यामध्ये घंटागाड्यांची खरेदी करण्यापासून ते दैनंदिन साफसफाईच्या कामासाठी तरतूद करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१४ पासून महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात असताना मागील सहा वर्षांच्या कालावधीत शहरातील घाणीचे किळसवाणे स्वरूप अद्यापही कायमच आहे. प्रशासनाने मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाण, बाजारपेठ तसेच प्रभागांमधील अंतर्गत रस्ते, सर्व्हीस लाइन, नाल्या आदींची दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना शहरात प्रत्येक ठिकाणी घाणीचे ढीग व अस्वच्छता कायम असल्याचे दिसून येते. एकूणच स्वच्छता विभागाची मुजोरी अकोलेकरांच्या आरोग्यावर उठल्याचे दिसून येत आहे.
काेराेनाच्या संकटात वाढ
प्रभागात स्वच्छतेच्या कामाची प्रत्यक्षात पाहणी करण्याचे काम आरोग्य निरीक्षकांचे आहे. शहरात ठिकठिकाणी घाण, अस्वच्छता साचल्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह आरोग्य निरीक्षक काेणते कर्तव्य बजावत आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे. काेराेनाच्या संकटात वाढ हाेत असतानाच अस्वच्छतेमुळे व्हायरल फिव्हरची साथ पसरली आहे. यामुळे नागिरकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.
२९ कोटींच्या बदल्यात स्वच्छतेला ठेंगा
संपूर्ण शहरात साफसफाईचा फज्जा उडाला असताना मनपाच्या आस्थापनेवरील ७४८ कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पडीत वाॅर्डांतील साफसफाई करणाऱ्या खासगी कंत्राटदारांच्या देयकापोटी प्रशासन वर्षाकाठी तब्बल २९ कोटी रुपयांची उधळपट्टी करीत असल्याची माहिती आहे. या २९ कोटींच्या बदल्यात शहरात नेमकी कोणती स्वच्छता राखली जाते, याचे मूल्यमापन आयुक्त संजय कापडणीस करतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे.