कचऱ्यावर प्रक्रिया; मुंबईच्या कंपनीसोबत चर्चा
By admin | Published: April 21, 2017 02:04 AM2017-04-21T02:04:30+5:302017-04-21T02:04:30+5:30
कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी अंमलबजावणीची गरज
अकोला : शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने शहराचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करणे नितांत गरजेचे झाले असून, यासंदर्भात मुंबई येथील कंपनीच्या प्रतिनिधींसोबत मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.
शहराच्या कानाकोपऱ्यातून जमा केलेला कचरा, घाण नायगाव येथील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या ‘डम्पिंग ग्राउंड’वर साठवला जातो. साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे कचऱ्याच्या समस्येने अकोलेकरांसह महापालिकेची डोकेदुखी वाढवली आहे. सद्यस्थितीत नायगावातील डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नाही. या भागातील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले असून, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना अक्षरश: नरक यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे साठवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे हाच मनपासमोर एकमेव उपाय शिल्लक आहे.
त्या पृष्ठभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी मनपात येऊन आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांची भेट घेतली. त्यावेळी कचऱ्याच्या समस्येवर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे.
अतिक्रमण कधी हटवणार?
नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडला अतिक्रमकांनी विळखा घातला आहे. दिवसेंदिवस ही जागा अतिक्रमकांच्या ताब्यात जात असल्याने संबंधितांना हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने धडक मोहीम राबविण्याची गरज आहे. पावसाळ्यात स्थानिक रहिवाशांना हाताशी धरून संबंधित अतिक्रमक मनपाच्या घंटागाडीवरील वाहनचालकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करीत असल्याचे समोर येते. तरीदेखील अतिक्रमकांना हुसकावून लावल्या जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात.
--