सर्वोपचारमधील सांडपाण्याचे होणार शुद्धीकरण!
By admin | Published: September 30, 2015 02:06 AM2015-09-30T02:06:06+5:302015-09-30T02:06:06+5:30
शुद्ध केलेले सांडपाणी कारागृहाला देणार.
नितीन गव्हाळे / अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामध्ये मोठय़ा प्रमाणात बाहेर पडणार्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, परिसरातील भूमिगत गटार योजनेचे ६0 टक्के काम पूर्ण झाले आहे. सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याची परवानगी वैद्यकीय महाविद्यालयाने शासनाकडे मागितली आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या कामास सुरुवात होईल. शुद्ध केलेले सांडपाणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहास वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भाचे ट्रामाकेअर सेंटर म्हणून सर्वोपचार रुग्णालयाकडे पाहिले जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थी व निवासी प्राध्यापकांची निवासस्थाने, रुग्णालय व त्यातील विभागातील दररोज हजारो लीटर सांडपाणी शहराबाहेर सोडल्या जाते. शहरातील मोर्णा नदीपर्यंत हे सांडपाणी सोडण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. सांडपाण्यामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढू नये, या दृष्टिकोनातून सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करण्याच्या दृष्टीने महाविद्यालय प्रशासनाने काही महिन्यांपासून हालचाली सुरू केल्या आहेत. परिसरात भूमिगत गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. भूमिगत गटार योजनेचे काम पूर्णत्वास आल्यानंतर सांडपाण्याचे शुद्धीकरण करणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शासनाची परवानगी मागितली आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर सांडपाण्याचे शुद्धीकरण करणारी यंत्रणा बसविण्यात येईल. येथील शुद्धीकरण केलेले सांडपाणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहास देण्यात येणार आहे. कारागृहाकडे स्वत:ची शेतजमीन असल्याने, शेतीसाठी हे पाणी उपयोगात आणण्यात येईल. तसेच कारागृहातील भाजीपाला व फुलशेतीलासुद्धा या पाण्याचा पुरवठा करता येईल.