अकोल्यात ‘सीसी’ कॅमे-यांचा वॉच!
By Admin | Published: March 19, 2017 02:58 AM2017-03-19T02:58:42+5:302017-03-19T02:58:42+5:30
अर्थसंकल्पात तरतूद ; गुन्हेगारांच्या हालचालींची मिळणार माहिती.
सचिन राऊत
अकोला, दि. १८- अकोल्यातील गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी तसेच पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करण्यासाठी अत्याधुनिक असलेले सीसी कॅमेर्यांचे जाळे शहरात पसरविण्यात येणार आहे. हायटेक्नॉलॉजीचे हे सीसी कॅमेरे लवकरच लावण्यात येणार असून गुन्हेगारांच्या हालचाली आणि वाहतुकीचे उल्लंघन करणार्यांवरही या सीसी कॅमेर्यांची नजर राहणार आहे.राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काही शहरांमध्येच सीसी कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये चार ते पाच शहरांचा समावेश असून अकोला शहरामध्ये हे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहे. शहरासह जिल्हय़ात वाढत असलेल्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा व पोलीस अधिकार्यांनी स्थानिक स्तरावर निधी जमा करून शहरात ७0 सीसी कॅमेरे लावले आहेत; मात्र हे सीसी कॅमेरे पाहिजे त्या प्रमाणात पॉवरफुल नसल्याने पोलिसांना त्याचा योग्य तो उपयोग झाला नाही. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुदीत सीसी कॅमेरे लावण्याचे जाहीर केल्यानंतर हे कॅमेरे प्रचंड पॉवरफुल तसेच ऑटोमॅटिक असल्याने गुन्हेगारी आणि वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कारवाई करण्यास पोलिसांसाठी सक्षम पर्याय होणार असल्याची माहिती मीणा यांनी दिली. सध्या असलेले ७0 सीसी कॅमेरे कार्यरत राहणार असून यासोबतच अत्याधुनिक सीसी कॅमेर्यांचे जाळे संपूर्ण शहरात लागणार आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचे कंबरडे मोडणार, हे निश्चित.
पोलिसांच्या प्रयत्नांचे फलित
शहरात सीसी कॅमेरे लावण्यासाठी पोलीस अधीक्षक मीणा यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. ७0 सीसी कॅमेरे पोलीस अधिकार्यांनी मदतीच्या साहाय्याने लावले, हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या या प्रयत्नांना यश देत स्वतंत्र निधीतून सीसी कॅमेरे लावण्याची तरतूद केल्याने पोलीस अधिकार्यांच्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे.
पोलीस आयुक्तालय हवे!
सीसी कॅमेरे लागणार आहेत; मात्र आणखी एक मोठा उपाय म्हणून पोलीस आयुक्तालय लवकर कार्यान्वित व्हावे, अशी अपेक्षा पोलीस अधिकार्यांकडून व्यक्त करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरीही झाली असल्याने आयुक्तालय लवकर कार्यान्वित व्हावे.