रेल देखो, बस देखो आंदोलन!
By admin | Published: August 10, 2014 01:40 AM2014-08-10T01:40:16+5:302014-08-10T20:57:03+5:30
जनमंच संघटनेच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी बसस्थानक व रेल्वे स्थानकावर ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ‘रेल देखो, बस देखो’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
अकोला: वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनमंच संघटनेच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी बसस्थानक व रेल्वे स्थानकावर ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान 'रेल देखो, बस देखो' हे अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी प्रवाशांना विदर्भ बंधन धागा बांधून, वेगळ्या विदर्भाची मागणी असलेली टोपी घालण्यात आली. सकाळी ११ वाजता बसस्थानक परिसरातील ब्रिजलाल बियाणी यांच्या पुतळ्याजवळ जनमंच व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोळा झाले होते. पुतळ्याला हारार्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. रेल्वे स्थानक तसेच बसस्थानकावर प्रवाशांना १0 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे विदर्भ बंधन धागा बांधण्यात आला. तसेच टोपी घालण्यात आली. प्रवाशांना वेगळ्या विदर्भाची गरज का आहे? याची माहिती देण्यात आली. विदर्भ बंधन धागा बांधून नागरिकांना विदर्भाशी त्यांचे असलेले नाते घट्ट करण्यात आले. यावेळी गणेश पोटे, धनंजय मिश्रा, कृष्णा अंधारे, रामेश्वर बरगट, जयंत सरदेशपांडे, गणेश उदापुरे, इमरान खान, फिरोज खान, एहजाज खान, सलीम शाह, विनोद गुप्ता, गोपाल देशमुख यांच्यासह जनमंच व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी तीन महिन्यांनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. निवडणुकीच्या काळात अनेक चमत्कार घडतात. त्यामुळे आंदोलनाची हीच योग्य वेळ असल्याने वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन तीव्र झाले. त्यामुळे पुढील तीन महिन्यात क्रियाशील राहून वेगळ्या विदर्भाची चळवळ जोमात चालविण्यात येणार आहे.