जलवाहिनीच्या ‘लिकेज’मध्ये अडकले ४४ गावांचे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:35 PM2018-05-05T14:35:43+5:302018-05-05T14:35:43+5:30
चोहट्टाबाजार ते उगवा फाट्यापर्यंतच्या जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती (लिकेज) लागत असल्याने घुसर येथील टाकीत (सम्प) पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी, चोहट्टाबाजार ते उगवा फाट्यापर्यंतच्या जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती (लिकेज) लागत असल्याने घुसर येथील टाकीत (सम्प) पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. जलवाहिनीच्या ‘लिकेज’मध्ये टंचाईग्रस्त ४४ गावांचा पाणीपुरवठा अडकला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ‘वाण’ चे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, गत सप्टेंबरपासून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना धरणातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी टंचाईग्रस्त गावांना गत आॅक्टोबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली. या योजनेत उगवा फाटा ते घुसरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकून घुसर येथील ‘सम्प’मधून ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चाहोट्टा बाजार येथे ६० अश्वशक्तीचे सबमर्सिबल पंप बसविण्यात आले असून, जमिनीखाली टाकी (सम्प)चे काम पूर्ण करण्यात आले. तसेच उगवा फाट्यापासून घुसर येथील ‘सम्प’पर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत गत आठवड्यात पूर्ण करण्यात आले. ४४ गावांना पाणीपुरवठा करण्याची चाचणी घेण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत १५ किलोमीटर जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागत असल्याने, नवीन जलवाहिनीद्वारे घुसर येथील ‘सम्प’पर्यंत वाण धरणाचे पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. जुन्या जलवाहिनीवरील ‘लिकेज’मध्ये टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा अडकला आहे. त्यामुळे जलवाहिनीवरील लिकेज दुरुस्तीचे काम केव्हा पूर्ण होणार आणि टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ‘वाण’चे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जुन्या जलवाहिनीवर ७० ठिकाणी ‘लिकेज’ काढण्याचे काम पूर्ण!
वान धरणातून अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १२ वर्षांपूर्वी चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत १५ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली होती. उगवा फाटा ते घुसरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकून ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे; परंतु चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत जुन्या जलवाहिनी ठिकठिकाणी ‘लिकेज’ होत आहेत. ४ मेपर्यंत जुन्या जलवाहिनीवरील ७० ठिकाणी ‘लिकेज’ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावरच!
खारपाणपट्ट्यातील टंचाईग्रस्त ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले असले, तरी अद्याप या गावांपर्यंत ‘वान’चे पाणी पोहोचले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांना टँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर तसेच पैसे देऊन विकत घेतलेल्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.
चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत जुन्या जलवाहिनीवरील ‘लिकेज’ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७० ठिकाणी ‘लिकेज’ काढण्यात आले. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
-सुनील चव्हाण, उपअभियंता, मजीप्रा, अकोला.