धरणात पाणी उपलब्ध; पण ६४ खेड्यांत पाणीटंचाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 02:21 PM2020-02-11T14:21:24+5:302020-02-11T14:21:35+5:30
६४ खेड्यांतील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
- संतोष येलकर
अकोला : धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी; जुन्या जलवाहिनीची वारंवार होणारी तुटफूट आणि जलवाहिनीला ठिकठिकाणी लागणाऱ्या गळतीमुळे (लिकेजेस) जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन कोलमडत आहे. त्यामुळे धरणात पाणी उपलब्ध असले तरी, ६४ खेड्यांतील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जुनी जलवाहिनी शिकस्त झाली असून, वारंवार जलवाहिनीची तुटफूट होते. तसेच जलवाहिनीला ठिकठिकाणी वारंवार गळती (लिकेजेस) लागत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होतो. खांबोरा प्रादेशिक प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत खेड्यांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले असले तरी, वारंवार होणारी जलवाहिनीची तुटफूट आणि जलवाहिनीला लागणाºया गळतीमुळे चार दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडत असून, प्रत्यक्षात १० ते १२ दिवसाआड ६४ खेड्यांना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे धरणात पाणी उपलब्ध असले तरी, ६४ खेड्यातील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडण्याची अशी आहेत कारणे!
- -जुन्या जलवाहिनीची वारंवार तूटफूट होणे
- -जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागणे
- -वीजपुरवठ्याचे रोहित्र नादुरुस्त होणे
- -पाणी उचल करण्याचे जुने पंप नादुरुस्त होणे
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत अनेक ठिकाणी जलवाहिनीची तुटफूट होत असल्याने पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गेल्या १२ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा ९ फेबु्रवारी रोजी सुरू झाला. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
- दिलीप मोहोड
सरपंच, आखतवाडा
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र जुन्या जलवाहिनीची तुटफूट होत असल्याने आणि ठिकठिकाणी जलवाहिनी ‘लिकेज’ होत असल्याने, पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडत आहे.
-अनिल चव्हाण
शाखा अभियंता, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा अकोला उपविभाग