पातूर तालुक्यातील जलाशये कोरडीच

By admin | Published: August 10, 2014 07:05 PM2014-08-10T19:05:22+5:302014-08-10T20:56:46+5:30

दमदार सार्वत्रिक पावसाअभावी पातूर तालुक्यातील नदी-नाल्यांसह पाण्याचे इतर स्रोत कोरडेच असल्याचे चित्र आहे.

The water bodies in the Tapur taluka are dry | पातूर तालुक्यातील जलाशये कोरडीच

पातूर तालुक्यातील जलाशये कोरडीच

Next

पातूर: दमदार सार्वत्रिक पावसाअभावी पातूर तालुक्यातील नदी-नाल्यांसह पाण्याचे इतर स्रोत कोरडेच असल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही असलेली ही परिस्थिती भयावह असून, असेच चालू राहिले तर तालुक्यावर लवकरच भीषण जलसंकट ओढावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हय़ात दरवर्षी पावसाच्या सरासरीत आघाडीवर असणार्‍या पातूर या निसर्गरम्य तालुक्यावर यंदा मात्र पावसाची अवकृपा झाली आहे. एरव्ही जलसंपदेने सुजलाम सुफलाम असलेला पातूर तालुका मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने ओसाड दिसत आहे. नदी-नाले भरभरून वाहतील व जलाशये तुडुंब भरतील, असा दमदार पाऊस तालुक्यात बरसलाच नाही. गत महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली; परंतु तो पाऊस जलाशये किंवा नदी-नाले भरतील असा नव्हता. पावसाअभावी तालुक्यातील प्रमुख जलाशयांची पातळी खूपच कमी झाली आहे. मोर्णा धरण ३४ टक्के, निगरुणा २३ टक्के, विश्‍वामित्री २६ टक्के, पातूर तलाव ३९ टक्के भरलेले आहे. तुळजापूर गावंडगाव यासह इतर लहान तलाव अद्यापही कोरडेच आहेत. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात तालुक्यातील धरणे व तलाव शंभर टक्के भरून ओसंडून वाहत होते. दरम्यान, पावसाने दगा दिल्यामुळे, तालुक्यातील शेतीपिकांची स्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे दिसून येत आहे. पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या उशिरा झाल्या. त्यातही मूग व उडिदाची वेळ निघून गेल्यामुळे शेतकर्‍यांनी पर्‍हाटी व सोयाबीनची लागवड केली. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने अनेकांच्या पेरण्या उलटल्या. दुबार पेरणीनंतरही अनेकांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. तर पर्‍हाटीवर मूळ कुडतरणार्‍या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांच्या संकटात भरच पडली आहे.

Web Title: The water bodies in the Tapur taluka are dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.