मोर्णा नदीवरील पुलावरून पाणी !
By admin | Published: July 13, 2016 01:56 AM2016-07-13T01:56:37+5:302016-07-13T01:56:37+5:30
शेकडो एकरातील पिके पाण्याखाली : तीन रस्त्यांवरील वाहतूक ठप्प.
हातरुण (अकोला) - बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसरातील नदी, नाल्यांना जोरदार पावसामुळे पूर आला असून दुधाळा, शिंगोली,बादलापूर मार्ग बंद पडल्याने वाहतूक ठप्प पडली.
कारंजा रमजानपूरजवळील पानकास नाल्याला पूर आल्याने हातरुण ते निंबा फाटा रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे प्रवाशांना निंबा येथे रात्र काढावी लागली.
हातरुण ते धामणा मार्गावरील मोर्णा नदीच्या पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्याने नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली. या पुरामुळे या मार्गावरील दुधाळा ,बोरगाव वैराळे गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने महसूल विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नुकतीच पेरणी केलेली शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेकडो शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुष्काळातून शेतकरी सावरलेला नसताना पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे.
हातरुण ते बादलापूर या मार्गावरील तीन नाल्यांना पूर आल्याने या मार्गावरील अकोला जाणारी वाहतूक सोमवारच्या दुपारपासून ठप्प पडली आहे. पुराचे पाणी हातरुण गावनजीक असलेल्या जागेश्वर मंदिराजवळ आल्याने मंगळवारी तेथे भरणारा आठवडी बाजार गावातील मुख्य चौकात भरला होता. नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण महसूल विभागाने करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी केली आहे.