२८ एकरांवरील खोदतळ्यांमध्ये पाणी साठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:11 PM2018-07-13T13:11:16+5:302018-07-13T13:13:32+5:30
२८ एकरांवर करण्यात आलेल्या खोदतळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला.
अकोला : लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामाला जलसंधारण कामांची सांगड घालून जिल्ह्यातील अकोट तालुक्यात जलसंधारणाची नऊ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये २८ एकरांवर करण्यात आलेल्या खोदतळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला.
जिल्ह्यातील अकोट तालुक्यात लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामाला जलसंधारणाच्या कामाची सांगड घालून जिल्हाधिकाºयांमार्फत गौण खनिज वापरासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामधून अकोट तालुक्यात २८ एकर क्षेत्रावर खोदतळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच पाच किलोमीटर खार नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. जलसंधारणाच्या या कामांच्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला आहे.
गावनिहाय अशी करण्यात आली जलसंधारणाची कामे !
लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामात खोदतळे व नाला सरळीकरण-रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये कालवाडी येथे ६ एकर, वणी वारुळा - २.५ एकर, बळेगाव - २.५ एकर, बळेगाव -२ एकर, तरोडा -४ एकर, करोडी -४ एकर, दनोरी-४ एकर व देवरी येथे ३ एकर क्षेत्रावर खोदतळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच ५ किलोमीटर खार नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.
खर्चाची बचत अन् गौण खनिजाची मिळाली ‘रॉयल्टी’
लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामात खोदतळे व नाला सरळीकरण-रुंदीकरणाची कामे करण्यात आली. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांसाठी येणाºया खर्चाची बचत झाली असून, जलसंधारणाच्या कामांमुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होणार आहे. तसेच लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामात गौण खनिज (माती) वापरापोटी जिल्हाधिकारी कार्यालयाला स्वामित्वधन शुल्काची (रॉयल्टी) रक्कमही मिळाली.
लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामात जलसंधारणाच्या कामाची सांगड घालून अकोट तालुक्यात जलसंधारणाची नऊ कामे पूर्ण करण्यात आली. या कामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल साठा उपलब्ध झाला आहे. तसेच गौण खनिज वापरापोटी शासनाला ‘रॉयल्टी’देखील प्राप्त झाली.
-डॉ. अतुल दोड,
जिल्हा खनिकर्म अधिकारी.