तर ‘जलयुक्त’च्या ६२७ कामांना लागणार ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:00 AM2020-01-08T11:00:41+5:302020-01-08T11:00:46+5:30
जलयुक्त शिवार कामांचा निधी थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास, जिल्ह्यात ‘जलयुक्त’च्या ६२७ कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या १ हजार ७५६ कामांपैकी १ हजार १२९ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६२७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. जलयुक्त शिवार कामांचा निधी थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास, जिल्ह्यात ‘जलयुक्त’च्या ६२७ कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये १ हजार ७५६ कामे प्रस्तावित करण्यात आली.
एकूण ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, मान्यता देण्यात आलेल्या कामांपैकी गत मे महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात १ हजार १२९ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने सिमेंट नालाबांध, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती व नूतनीकरण, जुन्या जलस्रोतातील गाळ काढणे,जलस्रोतांचे बळकटीकरण, नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, विहिरींचे पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर इत्यादी कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात मंजूर कामांपैकी ६२७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यानुषंगाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांचा निधी थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास, जिल्ह्यातील प्रलंबित जलयुक्त शिवारची ६२७ कामे थांबणार आहेत.