Water cup competition : अकोला जिल्ह्यातील १२ गावांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 06:04 PM2019-08-11T18:04:01+5:302019-08-11T18:04:54+5:30
अकोला जिल्ह्यातून चार तालुक्यातील १२ गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा-४ मध्ये चार तालुक्यातील १२ गावांना विविध पुरस्कारांनी ११ आॅगस्ट रोजी सन्मानीत करण्यात आले. तालुक्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या गावांना पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या वतीने रोख पुरस्कार देण्यात आले. जिल्ह्याला ८० लाख रुपये मिळाले आहेत. पुणे येथील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्यावतीने पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात पाणी फांउडेशनचे अध्यक्ष अमीर खान, मुख्यमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फ ाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा ४ राबवण्यात आली. या स्पर्धेत अंतर्गंत ८ एप्रिल ते मे अखेर पर्यंत श्रमदानातून तसेच यंत्रांच्या मदतीने जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली आहेत. या कामांचे दोन समित्यांनी मुल्यांकन करून पुरस्कारांची घोषणा केली आहे. तालुक्यातून पहिल्या आलेल्या गावाला पाणी फाउंडेशनच्या वतीने १० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातून द्वितीय गावाला सहा लाख रुपये आणि तृतीय आलेल्या गावाला ४ लाख रुपयांचा पुरस्कार शासनाच्या वतीने देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांचे कार्यकारी अधिकारी यांनी केली. अकोला जिल्ह्यातून चार तालुक्यातील १२ गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये तेल्हारा तालुक्यातून अडगाव बु.प्रथम, झरी बाजारला द्वितीय तर चंदनपूर गावाला तृतीय क्रमांक मिळाला. अकोट तालुक्यातून रुधाडी प्रथम, रंगापूर द्वितीय आणि जळगाव नहाटेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बार्शीटाकळी तालुक्यातून गोरव्हा प्रथम, सायखेडला द्वितीय आणि लोहगडला तृतीय क्रमांक मिळाला. पातूर तालुक्यात प्रथम पारितोषिक जांभरुनला, द्वितीय राहेर आणि सावरगावला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
या गावांना मिळाले पुरस्कार
अकोट- प्रथम-रुधाडी, द्वितीय-रंभापूर, तृतीय जळगाव नहाटे
तेल्हारा- प्रथम अडगाव बु, द्वितीय झरी बाजार, तृतीय चंदनपूर
बार्शीटाकळी-प्रथम गोरव्हा, द्वितीय सायखेड, तृतीय लोहगड
पातूर - प्रथम जांभरुन, द्वितीय राहेर, तृतीय सावरगाव