Water cup compitation : निवडणुकीच्या धामधुमीतही जलसैनिक श्रमदानात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 06:11 PM2019-04-16T18:11:46+5:302019-04-16T18:13:01+5:30
अकोला: लोकसभा निवडणुकीची जिल्ह्यात धामधुम सुरू असताना २६२ गावातील जलसैनिक श्रमदान करीत आहेत.
- संदीप वानखडे
अकोला: लोकसभा निवडणुकीची जिल्ह्यात धामधुम सुरू असताना २६२ गावातील जलसैनिक श्रमदान करीत आहेत. अभिनेता अमिर खानच्या पाणी फाउंडेशन अंतर्गंत वाटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील चार तालुक्यांनी सहभाग घेतला आहे. ८ एप्रिल पासून स्पर्धा सुरू झाल्यापासून ग्रामस्थ जलसंधारणासाठी श्रमदान करीत असल्याचे चित्र आहे.
पावसाच्या पाण्याचे संचयन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, या उदात्त हेतूने अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने अकोला जिल्ह्यात चार तालुक्यात वॉटर कप राबवण्यात येत आहे. कपमध्ये सहभागी होण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ रुजत आहे. प्रत्येक गावात पाणलोट व्यस्थापनाच्या वैज्ञानिक पद्धती वापरून पावसाचे पाणी साठवले पाहिजे, या हेतूने सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन पाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. हा कप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ््या गावांमध्ये लावलेली शर्यत होय. स्पर्धेला ८ एप्रिललाच धडाक्याने सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, ही स्पर्धा सुरू झाली आहे. जिल्हाभरात प्रचाराचा धुराळा उडत असताना अनेक जलसैनिक जलसंधारणासाठी श्रमदानात गुंतलेले आहेत. गावे पाणीदार करण्यासाठी लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वच श्रमदानात वाटा उचलत आहेत. अनेक गावांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रात्री १२ वाजता श्रमदानास सुरूवात करून उत्साहाने सहभाग घेतला आहे.तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथे तृतीय पंथीयांच्या हस्ते पूजन करून श्रमदानास सुरूवात करण्यात आली. पहिल्या दिवसाचा हा उत्साह अनेक गावांमध्ये कायम आहे. लोकशाहीच्या उत्सवासोबतच जिल्ह्यात श्रमदानाचा उत्सवही सुरू असल्याचे चित्र आहे. पहिल्याच दिवशी जलदिंडी, गावातून प्रभात फेरी काढून तसेच विविध उपक्रम राबवून श्रमदानास सुरूवात झाली आहे. प्रशिक्षण घेउन आलेले जलमित्र ग्रामस्थांना शास्त्रशुद्ध पद्धतीने जलसंधारणाची कामे कशी करावी,याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. सकाळी आणि सायंकाळी ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. जलसंधारणासाठी श्रमदानाची चळवळ उभी राहत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.