अकोला जिल्ह्यातील दोनशेहून अधिक गावांमध्ये १ मे रोजी महाश्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 02:28 PM2018-04-23T14:28:48+5:302018-04-23T14:28:48+5:30
पाणी फाउंडेशनच्या जलमित्र संकेतस्थळावर नाव नोंदणी करून शहरातील लोकांना १ मे महाराष्ट्रदिनी गावखेड्यातील श्रमदान कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
अकोला : अभिनेता आमिर खान व किरण राव यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील अकोट, पातूर, तेल्हारा व बार्शीटाकळी तालुक्याचा समावेश आहे. शहरातील लोकांना गावकऱ्यांसोबत श्रमदान करण्याची संधी मिळावी, यासाठी अभिनेता आमिर खान यांनी जलमित्र संकल्पना पुढे केली आहे. पाणी फाउंडेशनच्या जलमित्र संकेतस्थळावर नाव नोंदणी करून शहरातील लोकांना १ मे महाराष्ट्रदिनी गावखेड्यातील श्रमदान कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. जलमित्रांच्या सहभागातून अकोला जिल्ह्यातील दोनशेहून अधिक गावात १ मे रोजी महाश्रमदान घडणार आहे. १ मे या श्रमदानामध्ये नोंदणी करण्यासाठी २५ एप्रिल ही अंतिम तारीख आहे. जलमित्र अॅपवर आतापर्यंत एक लाख शहरी नगारिकांनी श्रमदानासाठी नाव नोंदणी केली आहे. पाणी फाउंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दोन वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या दोन वर्षांमध्ये जवळपास १५००० गावांनी वॉटप कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यामुळे जवळपास १० हजार कोटी लीटर पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. यंदा स्पर्धेच्या तिसºया वर्षामध्ये महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमधील ७५ तालुक्यांत चार हजारांहून अधिक गावे स्पर्धेत सहभागी आहेत.