पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2017 02:40 AM2017-03-20T02:40:54+5:302017-03-20T02:40:54+5:30
जलजागृती सप्ताहानिमित्त अकोल्यात ‘वॉटर रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद!
अकोला, दि. १९- पडणार्या पावसाचा थेंब अन् थेंब अडवून जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. भविष्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. यासाठी जलजागृती करणे, जलसंर्वधन करणे तसेच असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
राज्यात १६ ते २२ मार्च २0१७ दरम्यान जलसंपदा व पाटबंधारे विभागामार्फत पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटविण्यासाठी जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त रविवार, १९ मार्च रोजी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून एका भव्य वॉटर रनचे आयोजन करण्यात आले. या वॉटर रनचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, अकोला पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांची प्रमुख उपस्थिती होती. वॉटर रनची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून अशोक वाटिका- नवीन बसस्थानक- टॉवर चौक ते पुन्हा नवीन बसस्थानक -अशोक वाटिका मार्गे अधीक्षक अभियंता अकोला पाटबंधारे मंडळ येथे समारोप करण्यात आला. या वॉटर रनच्या पुढे जलजागृतीचे संदेश देणारे फलक शेकडोच्या हातात होते. जल है, तो कल है, पाण्याची बचत काळाची गरज, पाणी वाचवा देश वाचवा, यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण शहर जलजागृतीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत होते. वॉटर रनमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी जलजागृतीचे संदेश देणारे टी शर्ट परिधान केले असल्यामुळे एक वेगळीच छटा रॅलीला दिसत होती. प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, संचालन अरविंद भोंडे यांनी केले. या वॉटर रनमध्ये पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन जिल्हा माहिती कार्यालय तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.