अतिक्रमण हटाव माेहिमेवर पाणी; लघु व्यावसायिकांचे ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:03+5:302021-09-05T04:24:03+5:30
शहरात फाेफावलेल्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकाेलेकर प्रचंड वैतागले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या बाजारपेठेला लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांनी विळखा घातला ...
शहरात फाेफावलेल्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकाेलेकर प्रचंड वैतागले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या बाजारपेठेला लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांनी विळखा घातला असून, यामुळे वाणिज्य संकुलांमधील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. गांधी राेड, जैन मंदिर परिसर, माेहम्मद अली राेड, सिटी काेतवाली ते टिळक राेड, लाेखंडी पूल ते जयहिंद चाैक, खुले नाट्यगृह ते सांगलीवाला शाेरूम, काला चबुतरा मार्ग, इंदूर गल्ली आदी भागातून दुचाकी तर साेडाच पायी चालणे कठीण झाले आहे. सणासुदीच्या दिवसांत खरेदीसाठी नागरिकांची माेठी गर्दी हाेते. ही बाब लक्षात घेता शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या बाजारपेठेतील वर्दळीचे रस्ते माेकळे करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी अतिक्रमण हटाव माेहिमेला प्रारंभ केला. प्रशासनाच्या माेहिमेवर पाणी फेरण्याचे काम लघु व्यावसायिक, फेरीवाले करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे.
वाणिज्य संकुलांमध्ये लपवतात हातगाड्या!
मनपाने अतिक्रमण हटाव माेहिमेला प्रारंभ केला की रस्त्यालगत हातगाडीवर विविध साहित्याची विक्री करणारे लघु व्यावसायिक त्यांच्या हातगाड्या गांधी चाैकातील तसेच सिटी काेतवाली मागच्या वाणिज्य संकुलाच्या तळघरात लपवून ठेवत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
मनपा काही वाकडे करू शकत नाही!
जठारपेठ चाैकातील भाजीविक्रेत्यांनी पर्यायी जागेची मागणी केली असता त्यांना मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक ५च्या आवारात आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून १०७ गाळे बांधून देण्यात आले. याकडे पाठ फिरवित भाजी विक्रेत्यांनी अक्षरश: रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यांना हटकले असता महापालिका आमचे काहीही वाकडे करू शकत नसल्याचे छातीठाेकपणे सांगतात.