मूर्तिजापूर येथे जलवाहिनीला गळती; दूषित पाणीपुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:16 AM2021-04-14T04:16:47+5:302021-04-14T04:16:47+5:30
मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. गोयंकानगर येथे मुख्य जलवाहिला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय ...
मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. गोयंकानगर येथे मुख्य जलवाहिला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच मुख्य जलवाहिनीत सांडपाणी जात असल्याने शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याकडे न.प.चे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन तात्काळ गळती थांबविण्याची मागणी होत आहे.
नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गोयंकानगर येथे गत काही वर्षांपासून गळती लागलेली आहे. परिसरात खड्डा निर्माण झाल्याने या खड्ड्यात घाण पाणी साचत आहे. तसेच जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यास खड्ड्यातील घाण पाणी जलवाहिनीत शिरत असल्याचे चित्र आहे. याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र, गत वर्षभरापासून परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचा आरोप नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी केला आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर जलवाहिनीला लागलेल्या गळतीतून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाणी खड्ड्यात साचत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच घाण पाणी जलवाहिनीत जात असल्याने आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोरोनाच्या संकटात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने तात्काळ कार्यवाही करून मुख्य जलवाहिनीची गळती थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिली आहे.(फोटो)
------------------------------------
मूर्तिजापूर नगरपालिकेद्वारा नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गोयंकानगर येथील त्वरित लिकेज बंद करावे, तसेच शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनीची दुरुस्ती करावी.
-द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक, मूर्तिजापूर.