मूर्तिजापूर शहरातील नवीन घरकुल परिसरात जलवाहिनीला गळती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:10+5:302021-01-23T04:19:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मूर्तिजापूर : नगर परिषदेंतर्गत येत असलेल्या एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी पुनर्वसन विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या खदान जुनी वस्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : नगर परिषदेंतर्गत येत असलेल्या एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी पुनर्वसन विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या खदान जुनी वस्ती परिसरातील नवीन घरकुल वस्तीत जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. रस्त्यावर डबके साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास होत आहे.
नवीन घरकुल परिसरात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास नगर परिषद प्रशासन असमर्थ ठरत असल्याची तक्रार नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद रामदास दुबे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. खदान जुनी वस्ती परिसरात नव्याने ६२० घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या परिसरात पाण्याची टंचाई असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे दुबे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नगर परिषदेमार्फत आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते; जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती असल्यामुळे हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे नगरसेवक दुबे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दोन दिवसात जलवाहिनीची दुरुस्ती करून परिसरात स्वच्छता करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवक दुबे यांनी दिला आहे.
(फोटो)