मूर्तिजापुरात ‘पाण्याचा’ पैसा!
By admin | Published: April 18, 2017 08:18 PM2017-04-18T20:18:29+5:302017-04-18T20:18:29+5:30
मूर्तिजापूर- शहरात अनेक ठिकाणी पाणी थंड करून विकण्याचा सपाटा व्यावसायिकांनी लावला आहे. शुद्धतेची खातरजमा केली जात नसल्याने पाणी विक्रीचा गोरखधंदा कमालीचा फोफावला आहे.
दिवसाकाठी २ लाखांची उलाढाल : शुद्धीकरणाची खात्री नाही
मूर्तिजापूर: शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ पाणी थंड करून विक्री करण्याचा सपाटा शहरात सुरू आहे. खरेच पाणी शुद्ध केल्या जाते की नाही, याबाबत कोणीही खातरजमा करीत नसल्यामुळे पाणी विक्रीचा गोरखधंदा कमालीचा फोफावला आहे. या व्यवसायामध्ये दिवसाकाठी दीड ते दोन लाख रुपयांची उलाढाला होत असून, पाणी शुद्धीकरणाबाबत ग्राहकांनी आता आग्रही असण्याची गरज अधोरेखित होत आहे.
सध्या प्रखर उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाणीटंचाई तीव्र झाली आहे. त्यातच लग्न, मंगलकार्य व फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेऊन पिण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. त्यामुळे ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद, पाणी पाऊच विक्रीचा उद्योग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कमाईच्या हव्यासापोटी अनेक कंपन्या (लोकल) पाऊच अथवा बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ करताना दिसून येतात. मिनरल वॉटरचा वाढता खप लक्षात घेऊन अनेकांनी पाणी कॅन विक्रीचा धंदा उघडला आहे. केवळ पाणी थंड करून ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली पाणी विक्री केल्या जात आहे. ग्राहक घशाची कोरड घालविण्यासाठी केवळ थंड पाणी मिळते म्हणून पाणी विकत घेतात व तृष्णातृप्ती करतात; मात्र या पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गदा येण्याची शक्यता आहे. शहरात ८ ते १० विक्रेते असून, एक-दोन वगळले तर उर्वरित बोगस असल्याचे जाणकार सांगतात. त्यांच्याकडील पाण्याची तपासणी अद्यापही नसल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे अन्न औषधी प्रशासनाने याकडे लक्ष वेधून पाण्याच्या शुद्धतेची तपासणी करण्याची मागणी जाणकार ग्राहकांनी केली आहे.
पाऊच विक्री थंडावली!
शहरात पाऊच २ रुपयांमध्ये विकत असताना कॅनमधील पाणी एक बिसलरी ५ रुपयात सर्रास विक्री होत आहे. थंड पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांचा ओढा कॅनकडे वाढला आहे. त्यामुळे पाऊच विक्रीला फटका बसत आहे.
अन्न-औषध विभाग निद्रिस्त
बाटली व पाऊचमध्ये पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक आहे. तथापि, परवाना न काढताच काही जण पाणी विक्री करतात. नागरिकांच्या आरोग्याला धोका झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उरतो. त्यामुळे या विभागाने जागे होऊन पाणी विकणाऱ्यांचा परवाना तपासणे गरजेचे आहे.