शहरातील जलप्रदूषण वाढले; शेकाट्यांनी दिला अकोलेकरांना इशारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:03 AM2018-01-05T02:03:09+5:302018-01-05T02:05:34+5:30
अकोल्यात प्रदूषणाची समस्या वाढतीच आहे. शेकाट्या (Black Winged Stilt) नावाच्या पक्ष्यांनी शहरातील विविध डबक्यांवर, साचलेल्या सांडपाण्यावर मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावून हा इशारा अकोलेकरांना दिला आहे. हा इशारा मात्र इश्काचा किंवा प्रेमाचा नसून, शहरातील जलप्रदूषण वाढल्याचा इशारा आहे.
दीपक जोशी ।
अकोला : ‘केला इशारा जाता जाता’ हा अरुण सरनाईक यांच्या दमदार अभिनयाने गाजलेला मराठी चित्रपट. त्याचे कथानक काय होते, हे आता आठवत नाही पण, तो इशारा मात्र इश्काचा असावा, हे मात्र नक्की. आज या चित्रपटाचे स्मरण होण्याचे कारण की आपल्या शहरात सध्या दैनंदिन कचरा संकलन करण्याचे, नागरिकांनी शहरामध्ये घाण करू नये म्हणून अकोलेकरांना जागरूक करून वेळ पडल्यास दंडाचे हत्यार उगारून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जी मोहीम उघडली आहे. त्या मोहिमेनंतरही अकोल्यात प्रदूषणाची समस्या वाढतीच आहे. शेकाट्या (Black Winged Stilt) नावाच्या पक्ष्यांनी शहरातील विविध डबक्यांवर, साचलेल्या सांडपाण्यावर मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावून हा इशारा अकोलेकरांना दिला आहे. हा इशारा मात्र इश्काचा किंवा प्रेमाचा नसून, शहरातील जलप्रदूषण वाढल्याचा इशारा आहे.
गेल्या तीन दिवसांत शहरातील मोर्णा नदीचे काठ, रेल्वे लाइन लगतचे जवळच्या नागरी वस्तीतून सोडण्यात येणारे पाण्याचे स्रोत त्यातून निर्माण झालेली डबकी, बियाणे महामंडळाच्या नर्सरीजवळील पाणवठा, एमआयडीसीतील काही पाण्याचे स्रोत यांची पाहणी केली असता असे आढळून आले की शेकाट्या या पक्ष्यांची येथे मोठय़ा संख्येने उपस्थिती आहे. त्यांची एवढय़ा संख्येने हजेरी म्हणजे पाण्याचे गंभीर प्रदूषण या पक्षांचे प्रदूषित पाण्यातील कीटक हे आवडते खाद्य होय.
आरोग्य विभागाने या परिसरात स्वच्छता मोहिमेसाठी त्वरित पावले उचलावीत. तसेच या परिसरातील नागरिकांनीसुद्धा स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी; अन्यथा त्याचे गंभीर परिणाम व्हायला वेळ लागणार नाहीत असा इशाराचा या पक्षांच्या उपस्थितीमुळे मिळाला आहे.
अकोल्याच्या पंचक्रोशीतील कापशी मोर्णा धरण, धाब्याजवळील चेल्का तलाव, बोरगावच्या मच्छी तलाव, पोपटखेडचा तलाव तसेच खामगावचा जनुना तलाव, नीळेगावचे धरण, वाशिमचा एकबुर्ज तलाव येथे शेकाट्यांची उपस्थिती फारच तुरळक आहे.
कारण तेथील पाण्याचा पोत अद्याप तरी चांगला असावा म्हणून शेकाटे तेथे जाण्यास अनुत्सुक असावेत. अशा शेकाट्यांची हजेरी घेण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून आम्ही सारे पक्षीमित्र त्यामध्ये रवी नानोटी, प्रा. दिवाकर सदांशिव, विजय मोहरील, दिलीप जडे, दिलीप कोल्हटकर, प्रा. सहदेव रोठे ही मंडळी दंग होतो. अकोलेकरांनी या पक्ष्यांनी दिलेला इशारा समजून घेत प्रदूषण टाळण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- - शेकाट्या हा जगातील सर्वात उंच पायाचा पक्षी म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळी सर्कशीत विदूषक ज्या पद्धतीने बांबूच्या सहाय्याने आपली उंची वाढवून प्रेक्षकांचे लक्ष वेधून मनोरंजन करायचा तसाच हा पक्षी पक्षीमित्रांचे लक्ष आपल्या हालचालींनी वेधून घेत असतो.
- - दिवसेंदिवस माणसाला नवनवीन समस्या भेडसावत असतात. आरोग्याच्या समस्या तर फारच तापदायक, क्लेशदायक असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यास पक्षी फार मोलाची भूमिका बजावत असतात.