जलपुनर्भरणच तारणार!
By admin | Published: May 7, 2017 11:48 PM2017-05-07T23:48:22+5:302017-05-07T23:48:22+5:30
खारपानपट्टय़ातील भीषण वास्तव: शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याची गरज.
राजरत्न सिरसाट
अकोला : भूगर्भातील पाण्याचा अनेक प्रकारे प्रचंड उपसा सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने घसरण होत आहे. गत काही वर्षांत पावसाचा आलेख घसरला असून, याचा विपरित परिनाम पीक परिस्थितीवर झाला आहे. या पृष्ठभूमीवर शेतात जलपुनर्भरण हाच एकमेव पर्याय असून, याकरिता शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
खारपाणपट्टय़ात आजमितीस ४00 गावांपर्यंत नळ योजना पोहोचली असून, उर्वरित गावे मात्र पाणी दुर्भिक्षाच्या झळा सोसत आहेत. या ४00 खेड्यांना वेळेवर व पूरक पाणी मिळत नसल्याच्या सातत्याने तक्रारी सुरू च आहेत. खारपाणपट्टय़ातील पूर्णा नदीच्या चंद्रभागा, काटेपूर्णा, मोर्णा या उपनद्यांच्या काठालगत काहीसे गोडे पाणी शेतकरी उचलतात; पण उर्वरित सर्वच भागात खारे पाणी आहे. या भागात ६0 ते ७0 फुटांवर पाणी उपलब्ध आहे. सर्व पाणी प्रचंड खारे आणि फ्लोराईड, नायट्रेट, आम्लयुक्त असल्याने हे पाणी सेवनास घातक आहे. या जिल्हय़ात विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी सर्वेक्षण करू न पशुधनाची माहिती गोळा केली आहे. या सर्वेक्षणात मुख्यत्वे उन्हाळ्यात पशूंमध्ये किडनीचे आजार दिसून आले आहेत. त्यांच्यामध्ये मिठाचे प्रमाण दुपटीने वाढल्याचेही निष्पन्न झाले आहे. जनावरांमध्ये पाण्यात विरघळलेले क्षार हे साधारणत: ५00 टीडीएस असतात. खारपाणपट्टय़ातील पशूंमध्ये हे प्रमाण ६000 टीडीएस म्हणजे दहापट दिसून आले आहे. त्याचा प्राण्यावरही प्रतिकूल परिणाम होत आहेत.
-देशात कर्नाल येथे एकच खारपाणपट्टा संशोधन केंद्र
देशात केवळ हरियाणा राज्यातील कर्नाल येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे एकमेव केंद्रीय माती खारपाणपट्टा संशोधन केंद्र आहे. त्यामुळे या भागात दुसरे केंद्र देण्यास वाव आहे. अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेकडे जागा उपलब्ध आहे, संसाधने आहेत. केवळ या केंद्रासाठी काही पदांची सोय करावी लागणार आहे.
- कृषीसाठी स्वतंत्र केंद्राचा प्रस्ताव धूळ खात
खारपाणपट्टय़ाचा कृषी व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, त्यासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र या भागात देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने राज्य शासनाला प्रस्ताव दिला आहे. शासनाने अद्याप त्या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही. अशावेळी पशू, पक्षी संशोधन केंद्र मिळेल का, असा प्रश्न येथील पशुवैद्यक संस्थेच्या शास्त्रज्ञांना पडला आहे.
- जलसंवर्धनासाठी जलपुनर्भरण करणे हाच एकमेव पर्याय आहे. शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेली जलसंधारणाची कामे तर व्हावीच, शिवाय शेतकर्यांनीदेखील शेतात पुनर्भरणाची कामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने अनेक शिफारशी केलेल्या आहेत.
- डॉ. सुभाष टाले,
विभाग प्रमुख, मृद व जलसंधारण विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला.