पश्चिम विदर्भातील काही धरणात अल्प जलसाठा!
By admin | Published: September 2, 2016 12:40 AM2016-09-02T00:40:24+5:302016-09-02T00:40:24+5:30
काटेपूर्णा धरणात प्रथमच ८७ टक्के जलसाठा; नळगंगेत केवळ १७ टक्के.
अकोला, दि. १ : पश्चिम विदर्भातील जिल्हय़ांत यावर्षी ११0 टक्के पाऊस पडला आहे; पण धरणांच्या जलपातळीत पूरक वाढ झाली नाही. मुख्यत्वे अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील अनेक धरणात अद्यापही ५0 टक्केच्या आतच जलसाठा आहे. आता पाऊस परतीच्या मार्गावर असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जून-ऑगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हय़ात ६0७.३ मि.मी. पाऊस हवा होता, तो ६७0.७ मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच ११0 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या आकड्यात वाढ झालेली असली तरी बर्याच धरणांच्या साठय़ात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा विस्ताराने मोठे असलेल्या या धरणात यावर्षी ७५.६५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८७.६१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
मोर्णा मध्यम प्रकल्पात २४.३९ दलघमी (१२.८१ टक्के), निगरुणा २८.८५ दलघमी (१00 टक्के), उमा ११.६८ दलघमी (१00 टक्के), वाण ७0.१६ दलघमी (८५.६१ टक्के), पोपटखेड लपा ९.७८ दलघमी (९0.१६ टक्के) तर दगडपारवा या धरणात ४.४८ दलघमी म्हणजेच ४३.९६ टक्के जलसाठा आहे.
बुलडाणा जिल्हय़ातील खडकपूर्णा धरणात ३२.२४ दलघमी (३५.३९ टक्के) जलसाठा संचयित झाला असून, नळगंगा धरणात १२.३७ दलघमी म्हणजेच (१७.८४ टक्के), ज्ञानगंगा १४.६८ दलघमी (४३.२७ टक्के), मस १५.0४ दलघमी (१00 टक्के), कोराडी १२.५३ दलघमी (८२.८७ टक्के), पलढग ३.८८ दलघमी (५१.८६ टक्के), मन २४.४९ दलघमी (६६.४९ टक्के), पेनटाकळी १५.५९ दलघमी (२६.१६) टक्के, तोरणा २.९४ दलघमी (३७.२६ टक्के), उतावळी १९.७९ दलघमी (१00 टक्के) जलसाठा आजमितीस उपलब्ध आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात, तर सोनल या प्रकल्पात बर्यापैकी जलसाठा संचयित झाला आहे.
लघुप्रकल्पही अर्धेच
अकोला जिल्हय़ातील ३0 लघू प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प ओव्हरफ्लो आहेत. या प्रकल्पात ६५.५५ दलघमी म्हणजेच ४४.४४ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ८१ लघू प्रकल्पात केवळ ६९.७५ दलघमी म्हणजेच ३९.९१ टक्के जलसाठा आहे.
-अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणात ८७ टक्क्यावर जलसाठय़ाची वाढ झाली आहे. ३0 पैकी १३ लघुप्रकल्प ओव्हरफ्लो आहेत.
- विजय लोळे,
कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.