कृषी विद्यापीठातील पाण्याचे स्रोत आटले ; फळझाडे वाळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:38 PM2018-05-31T15:38:02+5:302018-05-31T15:38:02+5:30
कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील फळझाडे वाळली असून, काढणी यंत्राच्या चाचणीसाठी पेरण्यात आलेले भुईमूग पीकही वाळत आहे.
अकोला: यावर्षी पूरक पाऊस झाला नसल्याने पाण्याची पातळी खोल गेली. कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील फळझाडे वाळली असून, काढणी यंत्राच्या चाचणीसाठी पेरण्यात आलेले भुईमूग पीकही वाळत आहे. ‘लोकमत’ने याबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली, त्यानंतर कृषी विद्यापीठाने विहीर पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले आहे.
कृषी विद्यापीठाकडे जवळपास पाच हजार एकराच्यावर शेतजमीन आहे. यातील काही क्षेत्र संशोधनासाठी असून, मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर फळझाडे लावण्यात आलेली आहेत; पण वाढते तापमान आणि पाणी उपलब्ध नसल्याने ही फळझाडे वाळली आहेत. अलीकडच्या पाच-सात वर्षांत पावसाची अनिश्चितता बघता संशोधन, बीजोत्पादनावर परिणाम झाला असून, पूरक पाणी नसल्याने बीजोत्पादनावरही परिणाम होत आहे. कृषी विद्यापीठाच्या पश्चिम विभाग प्रक्षेत्रावरील फळझाडे वाळलेली दिसत आहेत.