नेर-धामणा बॅरेजमध्ये जलसंचय; जलसिंचन संघर्ष समितीने केले जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 04:01 PM2019-11-18T16:01:17+5:302019-11-18T16:05:16+5:30
या बॅरेजमध्ये जलसंचय झाल्याने जलसिंचन संघर्ष समिती व परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अकोला: पूर्णा नदीवरील नेर-धामणा बॅरेजमध्ये प्रथमच या वर्षापासून जलसंचय झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आनंद झाला; पण हे पाणी प्रत्यक्ष शेतात पोहोचेल तेव्हा आमचा आनंद द्विगुणित होईल, असे भावपूर्ण प्रतिपादन अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी रविवारी केले.
नेरधामणा पूर्णा बॅरेजला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भेट देऊन जलपूजन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. खारपाणपट्ट्यातील भीषण पाणीटंचाईवर उपाय म्हणून २००८ साली जिल्ह्यातील मंगरुळकांबे, घुंगशी, नेरधामणा, उमा नदीवरील रोहणा बॅरेजच्या कामाला प्रारंभ झाला. २०१२ साली पूर्ण होणाऱ्या या बॅरेजची कामे प्रलंबित झाली. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत महादेवराव भुईभार यांनी बॅरेजचा प्रश्न उपस्थित केला. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समिती स्थापन केली. वारंवार निवेदन देऊन धरणे दिले. जनसामान्यांच्या रेट्याने व जलसिंचन संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे पाणी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यपालांनी या बॅरेजला भेट देऊन समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, उपाध्यक्ष शिरीष धोत्रे, सचिव भाई प्रदीप देशमुख, प्रा. बोर्डे, अॅड. रामसिंह राजपूत, बबनराव कानकिरड यांच्यासोबत चर्चा करून या बॅरेजची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अनेक संकटांवर मात करीत २०१९ मध्ये या बॅरेजमध्ये जलसंचय झाल्याने जलसिंचन संघर्ष समिती व परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बॅरेजच्या नदीपात्रात पाणी पाहून आनंद होतो; पण पूर आला की बॅरेजच्या दोन्ही बाजूची माती वाहून जाते, पुढे शेतात, गावात पाणी शिरले, नदीकाठचे रस्ते बंद झाले, पाइपलाइनने शेतापर्यंत पाणी येणार होते, ती कामे अद्याप अपूर्णच आहेत, अशा तक्रारी ग्रामस्थ मांडत आहेत.
वºहाडला सोन्याची कºहाड म्हटले जाते. प्रत्यक्षात खारपाणपट्टा अनेक वर्षांपासून पाणी टंचाईशी झुंज देत आहे. संघर्ष करत असताना पूर्णा पात्रात पयोष्णी पाहून आता शेतकºयांच्या शेतात पाणी पोहोचेल. गोरगरिबांच्या, गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची, शेती सिंचनाची सुविधा होत आहे. हा अवघ्या खारपाणपट्टावासीयांसाठी आनंदाचा वर्षाव असल्याचे भावोद्गार शेकापचे भाई प्रदीप देशमुख यांनी काढले. जलपूर्णा जलपूजनप्रसंगी शाखा अभियंता देशमुख, सहायक अभियंता सैतवाल, बबनराव कानकिरड, मोहन पाटील भांबेरे, विजय भांबेरे, दिनकरराव भांबेरे, अॅड. रामराव पाटील (सांगवी), बंडूभाऊ मोडक (गोपाळखेड) यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.