लोकसहभागातून गोरव्हा गावाने घडविली जलक्रांती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:24 AM2021-06-09T04:24:07+5:302021-06-09T04:24:07+5:30

विझोरा : ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे एकमेकांच्या मदतीने अनेक कामे उभी राहतात. गोरव्हा गावात ...

Water revolution brought about by Gorva village through people's participation! | लोकसहभागातून गोरव्हा गावाने घडविली जलक्रांती!

लोकसहभागातून गोरव्हा गावाने घडविली जलक्रांती!

Next

विझोरा : ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे एकमेकांच्या मदतीने अनेक कामे उभी राहतात. गोरव्हा गावात राबविण्यात आलेला जलसंधारणाचा पॅटर्न आदर्श उदाहरण आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळलेल्या गोरव्हा गावाने जलक्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे गाव परिसर हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होऊन गावाचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. जलसंधारणचा गोरव्हा पॅटर्न सध्या जिल्ह्यात नावाजत आहे.

बार्शी-टाकळी तालुक्यातील गोरव्हा गाव आहे. गावाची लोकसंख्या १२४५ आहे. शासकीय गाव नमुना १ नुसार ५०७.८४ हेक्टर आर जमीन आहे. त्यापैकी लागवडीयोग्य जमीन ४२६.३८ हेक्टर आर आहे. बिगर लागवडी क्षेत्र व सार्वजनिक वापरासाठी इतर क्षेत्र ८१.४६ हेक्टर आर आहे.

वरील सर्व क्षेत्रामध्ये गावाच्या भविष्यातील गरजेनुसार व ग्रामस्थांच्या सहकार्याने जलव्यवस्थापन व जलसंवर्धनाची कामे करण्यात आली आहेत. सकारात्मक बदल घडविण्यासाठी गावाचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यामुळे गावातील शासकीय जमीन, वैयक्तिक शेत जमीन, शेत शिवार, पाणंद रस्ते, नाले, गाव तलाव, छोट्या ओढ्यांच्या लोकसहभागातून जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली.

गावातील सर्व शेती नैसर्गिक पावसाच्या भरवशावर अवलंबून होती. केवळ पाच हेक्टर शेती हंगामी ओलिताखाली होती. गावात केवळ पिण्यापुरते पाणी उपलब्ध होते. खरीप सोयाबीन पीक घेतल्यानंतर गावात पाणीच नसल्याने रोजगारासाठी ८० टक्के मजूर महानगरांमध्ये स्थलांतरित होत होते. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांना जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व आणि गरज समजली. जलसंधारणाच्या कामांमुळे गावातील पाणी स्रोतांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली.

फोटो:

सतत ५० दिवस श्रमदान मोहीम

गावातील लोक एकत्र आले. परिस्थिती व उपलब्ध जागेनुसार जलसंधारणाची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले. सतत ५० दिवस श्रमदान मोहीम राबवून विविध कामे करण्यात आली. त्यामुळे पाणी पातळी वाढली. सिंचन क्षमता वाढली. पाच हेक्टरवरून १३५ हेक्टरपर्यंत जमीन सिंचनाखाली आली.

रोजगार उपलब्ध झाला. गावामध्येच रोजगार मिळाल्याने स्थलांतरण कमी झाले.

भारतीय जैन संघटनेचे सहकार्य

भारतीय जैन संघटनेमार्फत मिळालेल्या जेसीबी व पोकलेन मशिनचा पुरेपूर वापर करीत ग्रामस्थांनी डिझेलसाठी जवळपास सहा लाख रुपये गोळा करून, लोणार नाल्याचे खोलीकरण केले. कधीकाळी कोरडा पडणारा नाला आता बारमाही वाहतो आहे. गावातील शेतशिवारातील ४२ विहिरींची पाणी पातळी २० फुटापर्यंत आली आहे. गावाच्या भौगोलिक क्षेत्रातील जमिनीची पाणी साठवण क्षमता कमालीची वाढली आहे.

९० शेतकऱ्यांच्या शेतात ढाळीचे बांध

९० शेतकऱ्यांच्या शेतात ढाळीचे बांध कंपार्टमेंट बंडींग करण्यात आले. यासाठी भारतीय जैन संघटनेने गावकऱ्यांना दोन जेसीबी उपलब्ध करून दिले. सतत १२० दिवस खोदकाम केले. कोरोना काळातही गावातील जलसंधारणाची कामे थांबली नाहीत. गोरव्हासारख्या दुष्काळी यातना भोगलेल्या गावात जलसंधारणामुळे जलसमृध्दी झाली आहे.

यांच्या प्रयत्नांमुळे गाव झाले पाणीदार

गावातील पाणीटंचाई सदृश परिस्थिती निवारण्यासाठी सरपंच राजेश पाटील खांबलकर, सचिव ज्ञानेश्वर बिचारे यांच्या पुढाकारातून गावातील लोकप्रतिनिधींनी माॅडेल व्हिलेज हिवरे बाजार, राळेगणसिद्धी व पाटोदा या आदर्श गावांना भेटी दिल्या. जलसंधारणाचे महत्त्व पटल्याने ग्रामस्थांनी बैठकी घेतल्या. विचार मंथनातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे जलसंधारण व जलव्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन घेतले.

Web Title: Water revolution brought about by Gorva village through people's participation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.