अकोला जिल्ह्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 04:02 PM2019-08-20T16:02:41+5:302019-08-20T16:02:45+5:30

१५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

Water scarcity in 64 villages in Akola district | अकोला जिल्ह्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी

अकोला जिल्ह्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी

Next

- संतोष येलकर

अकोला: पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पावसाच्या पाण्याने भरलेल्या उन्नई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातच जिल्ह्यातील खारपानपट्ट्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी निर्माण झाली आहे.
महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र काटेपूर्णा धरणात १९ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत केवळ ८.८५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असल्याने, गत पंधरा दिवसांपासून या बंधाºयातून ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र नळ योजनेंतर्गत १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पावसाळ्यातही पायपीट करावी लागत आहे. काही गावांत बोअरचे क्षारयुक्त पाणी तर काही गावांत टँकरचे पाणी विकत घेऊन ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांमध्ये पावसाळ्यातच ‘पाणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे.

...तर भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार!
पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असून, या बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी महिनाभर पुरेल एवढे पाणी सध्या या बंधाºयात उपलब्ध आहे. महान येथील काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही तर महिनाभरानंतर ६४ खेड्यातील ग्रामस्थांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार असल्याची स्थिती आहे.


खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावात १५ ते २० दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे गावाजवळील बोअरच्या क्षारयुक्त पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.
- शिवाजीराव भरणे
रामगाव, ता. अकोला.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांत १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे टँकरद्वारे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
- गजानन शेंडे
अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, गोपालखेड.


पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असून, या बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सध्या दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या बंधाºयात उपलब्ध आहे.
- अनिल चव्हाण
शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अकोला उपविभाग.

 

Web Title: Water scarcity in 64 villages in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.