बोरगाव वैराळे गावात पाणीटंचाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:09+5:302021-05-26T04:19:09+5:30
जिल्हा परिषदकडून सकारात्मक हालचाली होत नसल्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. खारपाणपट्ट्यात येत असलेल्या बोरगाव वैराळे शिवारात गोड ...
जिल्हा परिषदकडून सकारात्मक हालचाली होत नसल्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.
खारपाणपट्ट्यात येत असलेल्या बोरगाव वैराळे शिवारात गोड पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाहीत. वर्षभरापूर्वी बोरगाव वैराळे गावात पाणीपुरवठा करणाऱ्या एका बोअरवेलमध्ये मोटर पंप अडकला असून, दुसऱ्या बोअरची पाणीपातळी खोल गेली आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई जाणवत आहे. कोरोना संकटात ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी एका शेतकऱ्याच्या शेतातून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
पाणीपट्टी थकीत!
गावात करवसुली होत नसल्यामुळे ग्रामपंचायतला पाणी विकत घेणे शक्य नाही. या कारणामुळे दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला पाणीटंचाईच्या निधीतून बोअरवेलची मागणी केली आहे. बोरगाव वैराळेचा पाणीटंचाईचा प्रस्ताव दीड महिन्यापासून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात पडून होता. मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बोअरवेलच्या कामाला कधी सुरुवात होईल, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.