पश्चिम विदर्भावर पाणीटंचाईचे संकट गडद !
By admin | Published: December 2, 2015 02:51 AM2015-12-02T02:51:16+5:302015-12-02T03:16:13+5:30
अकोल्याला पाणीपुरवठा करणा-या काटेपूर्णात २३, नळगंगामध्ये २८, तर कोराडीत २.७१ टक्केच जलसाठा.
अकोला : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात पुरेसा पाऊस झाला नसल्याने या विभागात जलसंकट गडद झाले आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ २३.२४ टक्के जलसाठा शिल्लक असून, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नळगंगा या मोठय़ा धरणात २८.७९ टक्के, तर मेहकर तालुक्यातील कोराडी धरणात केवळ २.७१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांमध्ये पूरक जलसाठा संकलनावर परिणाम झाला असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस २३.२४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. आता तर पाऊस नाही आणि तापमानात वाढ झाल्याने या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अकोला जिल्हय़ातील मोर्णा या मध्यम प्रकल्पात ३२.३५ टक्के, निगरुणा ५२.९२ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात १३.७0 टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा प्रकल्पात आजमितीस २८.७९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ज्ञानगंगा प्रकल्प ५२.६३ टक्के, मस ३२.५५ टक्के, कोराडी २.७१ टक्के, तर पलढग प्रकल्पात ९५.८७ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्हय़ात बर्यापैकी जलसाठा शिल्लक असून, पूस या मोठय़ा प्रकल्पात ५५.५२ टक्के, तर लोअर पूसमध्ये ९१.५५ टक्के साठा आहे. सायखेडा या प्रकल्पात ६७.२0 टक्के, गोकी ७८.0८ टक्के, वाघाडी ७९ टक्के व बोरगाव या मध्यम प्रकल्पात ९१.२२ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्पाची पातळी सध्या बरी असली तरी उन्हाळ्य़ात पाणीटंचाईच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात ८0.२९ टक्के जलसाठा आहे.