पाणीटंचाईचा अकोल्यातील उद्योगांना फटका
By Admin | Published: July 3, 2014 01:31 AM2014-07-03T01:31:29+5:302014-07-03T01:41:49+5:30
सिमेंट पेव्हर्स, सिट, ब्रीक्स, दरवाजे खिडक्यांच्या उद्योगांवर परिणाम
सचिन राऊत/अकोला
जून महिना संपल्यानंतरदेखील पावसाळय़ातील पाण्याचा कुठलाही थांगपत्ता नसल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत असलेल्या उद्योगांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. पाणीटंचाईचा उद्योगांमधील उत्पादनावर परिणाम झाला असून, सिमेंट सिट, खिडक्या, दरवाजे, ब्रीक्स व पेव्हर्सचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्राबाहेर असलेल्या अनेक उद्योगांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यामुळे काही साहित्यांची भाववाढ करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतमधील उद्योगांना खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी चांगला पावसाळा झाल्याने जून महिन्याच्या अखेरपर्यंत उद्योगांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठय़ाचा प्रयत्न करण्यात येत आहे. एमआयडीसीतील सिमेंटच्या खिडक्या, दरवाजे, ब्रीक्स, सिमेंट सिट, सिमेंट पोल, सिमेंट पाईप, टाइल्स व तार फिनिशिंगसाठीच्या खांब निर्मिती करणार्या उद्योगांना पाणीटंचाई भासत आहे. या पाणीटंचाईमुळे सिमेंट उद्योगामधील उत्पादन घटले असून, या साहित्याची दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सिमेंटपासून विविध वस्तूंचे उत्पादन करणारे एमआयडीसीत तब्बल ७0 च्यावर उद्योग असून, तातडीने पाऊस न झाल्यास या उद्योगांवर आणखी मोठा परिणाम होणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
एमआयडीसीत सुमारे १२५ दालमिल असून, ऑईल मिल, सोयाबीन प्लांट, प्लास्टिक कंपन्या, फर्टिलायझर, अँग्रो मशिनरीज, कोल डेपो व गोल्ड फिंगरसह पुंगळय़ा कारखान्यांचा समावेश आहे. या उद्योगांना सद्य:स्थितीत करण्यात येत असलेला पाणीपुरवठा काही प्रमाणात समाधानकारक आहे; मात्र जुलै महिना सुरू झाल्यावरदेखील पावसाचे पाणी येत नसल्याने या उद्योगांना देण्यात येत असलेल्या पाण्यात कपात करण्याची शक्यता असल्याने सदरच्या उद्योगांच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. यासोबतच एमआयडीसीबाहेर असलेल्या उद्योगांना आता टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, यामध्ये सिमेंटपासून इतर वस्तूंचे उत्पादन करणारे अधिक उद्योग असल्याची माहिती आहे.