पाणी टंचाईच्या झळा वाढल्या !
By Admin | Published: May 5, 2017 02:06 PM2017-05-05T14:06:34+5:302017-05-05T14:06:34+5:30
धरणांतील जलसाठय़ाची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे.
शेकडो गावात पाण्यासाठी पायपीट;टॅँकरचा पत्ता नाही
अकोला : एप्रिलअखेरीस जिल्हयातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठय़ाची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४४ अंशापर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणात केवळ ३0 टक्के जलसाठा शिल्लक आहे.प्रशासनाने आतापासून नवे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान,महानगरपालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गुडधी गावात स्वांत्र्य मिळाले तेव्हापासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही,येथील नागरिकांना खारे पाणी सेवन करावे लागत आहे.
मागील वर्षी पाऊस बरा झाला तरी त्यामध्ये या भागात सातत्य नव्हते त्यामुळे यावर्षी मध्यम व मोठय़ा धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या पृष्टभूमीवर टंचाईची तीव्रता वाढल्याने नागरिकांची जिल्हा प्रशासनाकडे टॅँकरची मागणी वाढत आहे.
दरम्यान, उन्हाचा कडका ४२ ते ४४ अंशावर गेल्याने बाष्पीभवनाचा वेग दररोज ११ ते १४ मि.मी.ने वाढला आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणात एप्रिल महिन्याच्या शेवटी ३२ टक्के जलसाठा उपलब्ध होता, तो आजमितीस ३0 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात २१.५३, निर्गुणा २५.५३, उमा धरणात १४.१६ टक्के तर दगडपारवामध्ये १0.२९ टक्के जलसाठा आहे, तर तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ६0 टक्के जलसाठा होता यासर्व धरणांच्या जलसाठय़ामध्ये पुन्हा घसरण झाली आहे.
- गुडधी पाणी टंचाई
महानगर पालिकेत समाविष्ठ झालेल्या गुडधी यागावचे नागरिक सालोसाल खार्यापाण्याचे सेवन करत असून, प्रत्येक उन्हाळ्य़ात या पाण्यासाठीदेखील नागरिकांना मैलोगंती पायपीट करावी लागत आहे. यावर्षी येथे भीषण पाणीटंचाई आहे.ग्रामपंचायत असताना येथे पावणे दोन कोटी रू पये खचरून नळ योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली पण पाणी मिळाले नाही. महानगर पालिकेत गाव गेल्यानंतर पाणी मिळले अशी अपेक्षा होता पण ताही अद्याप पुर्ण झालेली नाही. ग्रामपंचायत असताना उन्हाळ्य़ात टॅँकरने पाणी पुरवठा केला जात होता . यावर्षी टॅँकरही नाही. नळयोजनेसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश राऊत यांनी याबाबतीत पुढकार घेत आहेत.
-काटेपूर्णा धरणात ३0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जून, जुलैपर्यंत हा जलसाठा वापरता येईल; परंतु यापुढे या शिल्लक असलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
- विजय लोळे,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे विभाग,
अकोला.