मूर्तिजापूर तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:24+5:302021-05-26T04:19:24+5:30
प्रस्तावित सात गावांत भीषण पाणीटंचाई असल्याचे कृती आराखड्यात नमूद आहे. परंतु, त्या गावांसाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने कृती ...
प्रस्तावित सात गावांत भीषण पाणीटंचाई असल्याचे कृती आराखड्यात नमूद आहे. परंतु, त्या गावांसाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने कृती आराखडा कागदावरच आहे.
तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, संभाव्य उपाय योजना म्हणून ७५ गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील किनी, चिखली, सोनोरी (मूर्तिजापूर), जामठी (माटोळा ), कवठा (खोलापूर), बोरगाव (निंघोट), साखरी, निंभा या गावांत पाणी टंचाईचे सावट आहे. या गावांसाठी विहिरी अधिग्रहित करणे, नळ दुरुस्ती करणे, आदी उपाय योजना प्रस्तावित आहे. कृती आराखड्यानुसार ७५ गावांतील १० गावांच्या उपाय योजनेसाठी पाणीटंचाई उपाय योजना, १७ विहिरी अधिग्रहित, १३ विहिरीतील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कूपनलिका पाणी टंचाई उपाय योजना आराखड्यात मंजूर करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात ७११.२० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस गतवर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात असला तरी विहिरी, विंधन विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. नद्या, बॅरेजेसमध्ये ठणठणाट असल्याने संपूर्ण तालुक्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
फोटो:
३७ गावांचा पाणीपुरवठा केला खंडित!
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुका शासकीय स्तरावर पूरक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात उमा प्रकल्पावर कार्यान्वित असलेली एकमेव लंघापूर ५७ खेडी पाणीपुरवठा योजना असून, उमा प्रकल्प तुडुंब भरलेला असल्याने ही योजना तालुक्यासाठी जल संजीवनी ठरणार असली तरी ग्राहकांनी देयके न भरल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ३७ गावचा पाणीपुरवठा खंडित केल्याने या गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, तर यावर्षीपासून यातील हातगाव, सोनोरी (मूर्तिजापूर) व हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालय यांना करार तत्त्वावर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जीवन प्राधिकरणकडून प्राप्त झाली आहे.
कृती आराखड्यात नदीकाठची गावे
कृती आराखड्यात विशेषतः निम्म्याहून अधिक नदीकाठचे मुंगशी, शेलू नजीक, वाघजाळी, ताकवाडा, दापुरा, शिरताळा, बपोरी, सोनोरी, शेलू बाजार, सांगवी, रोहणा, बोर्टा, लंघापूर, आदी गावांचा समावेश आहे. यावरून तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचे चित्र स्पष्ट होते.
रोहणा, काटेपूर्णा बॅरेजचे काम रखडले
विहिरींमधील पाण्याची पातळी खोल गेली आहे. बॅरेज कोरडे पडले आहेत. तालुक्यात तीन नवीन बॅरेजची निर्मिती करण्यात आली असली तरी रोहणा व काटेपूर्णा बॅरेजचे काम निधीअभावी रखडले आहे, तर घुंगशी बॅरेज पूर्णत्वास गेला आहे. परंतु त्यात पिण्यायोग्य पाणी नसल्याने परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या गावांमध्ये पाणीटंचाई
किनी, चिखली, सोनोरी (मूर्तिजापूर) , जामठी (माटोळा), कवठा (खोलापूर) बोरगाव (निंघोट), साखरी, निंभा या सात गावांत भीषण पाणीटंचाई असून, येथे नळयोजना दुरुस्ती व इतर उपाय योजना आराखड्यात प्रस्तावित आहे. परंतु, त्या योजना केवळ कागदावरच असल्याची माहिती आहे.
या गावांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना
मुंगशी, शेलू नजीक, टिपटाळा, वाघजाळी, ताकवाडा, दापुरा, गुंजवाळा, शिरताळा, राजुरा सरोदे, बपोरी, खोडद, पिंगळा, रेपाडखेड, सोनोरी बपोरी, शेलू बाजार, सांगवी, लंघापूर, रोहणा, बोर्टा, धानोरा वैद्य, किन्ही, भटोरी, ऐंडली, दुर्गवाडा, सैदापूर, खांदला, राजुरा घाटे, बोरगाव निंघोट, हिरपूर, माना, अदालतपूर, शेरवाडी, सुलतानपूर, सालतवाडा, चिखली.
धोत्रा (शिंदे), जामठी (माटोळा ), किनी, बोर्टा, कवठा (खोलापूर ) या पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. टँकरचा कोणत्याही गावाचा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. पाणीपुरवठा विभागामार्फत किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
- प्रदीप पवार
तहसीलदार, मूर्तिजापूर