पाणीटंचाई निवारण आराखडा मंजूर
By admin | Published: December 5, 2015 09:09 AM2015-12-05T09:09:26+5:302015-12-05T09:09:26+5:30
जिल्हाधिका-यांनी दिली मंजुरी: १९८ गावांसाठी ११ कोटींच्या २0 उपाययोजना.
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कृती आराखडयास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांतील १९८ गावांसाठी १0 कोटी ९९ लाख ३९ हजार रुपयांच्या २0 उपाययोजना या कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले आटले आहेत. त्यामुळे हिवाळ्यातच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीकरिता जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी तेल्हारा व पातूर हे दोन तालुके वगळता उर्वरित पाच तालुक्यातील १९८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध २0 उपाययोजनांची कामे करण्यासाठी १0 कोटी ९९ लाख ३९ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांमार्फत (सीईओ) ३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या या कृती आराखड्यास जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. कृती आराखड्यास जिल्हाधिकार्यांकडून मंजुरी मिळाल्याने आराखड्यात प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.