बाळापूर तालुक्यातील नदी काठच्याच गावांमध्ये पाणीटंचाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:17+5:302021-05-25T04:21:17+5:30
बाळापूर : तालुक्याला नैसर्गिक देण म्हणून तीन नद्या लाभल्या आहेत. असे असतानाही तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला ...
बाळापूर : तालुक्याला नैसर्गिक देण म्हणून तीन नद्या लाभल्या आहेत. असे असतानाही तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सद्य:स्थितीत बाळापूर तालुक्यातील १६ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या आहे. या गावांमध्ये पाणीटंचाई असूनही त्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पाणीपुरवठा आराखडा केवळ कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही.
बाळापूर तालुक्यात ८७ गावे, ६६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १६ गावांत पाणीटंचाई निवारण्यासाठी मागणीनुसार उपाययोजना करून पाणीटंचाई कृती आराखड्यात दरवर्षीप्रमाणे खर्च करण्यात येतो. परंतु नियमित खर्च करण्यात येत नाही. तालुक्याला तीन नद्यांची नैसर्गिक देण असतानासुद्धा भूगर्भातील पाण्याद्वारे तहान भागवावी लागते. त्यासाठी वीज व मशिनरी आली. त्या बंद झाल्यास गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. ग्रामस्थांना कायमस्वरूपी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाही. दरवर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होते. परंतु तालुका प्रशासनाकडून तात्पुरती व्यवस्था करून वेळ मारून नेण्यात येते. परंतु कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येत नाही.
या गावांमध्ये पाणीटंचाई
पाणीटंचाई निवारण्यासाठी पाच गावांत विशेष नळ दुरुस्ती करण्यात आली. परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तालुक्यातील पारस, वझेगाव, मोखा, नांदखेड टाकळी, टाकळी (खुरेशी), टाकळी (खोजबोळ) व मोरगाव (सादीजन), वाडेगाव, उरळ खु., झूरळ, मोरगाव (सादीजन), लोहारा, बारलिंगा, सावरपाटी, शेळद, कवठा अशा गावांमध्ये पाणीटंचाई आहे.
प्रस्तावित कामांकडे दुर्लक्ष
तालुक्यातील १६ गावांमध्ये विहीर, बोअरवेल अधिग्रहणाची कामे प्रस्तावित होती. त्यांना मंजुरी मिळाली आहे. पाणीटंचाईच्या तांत्रिक कामांना दरवर्षी मंजुरी देण्यात येते. परंतु कामे पूर्ण होतात की नाही, याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने मोठ्या प्रमाणात तांत्रिक बाबींवर खर्च करूनही उपयोग नाही.
कायमस्वरूपी नळ योजनाही बंद
अनेक गावांत कायमस्वरूपी नळ योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या योजनांनी ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळविले. पाणीटंचाई निवारण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही नदीकाठची गावे तहानलेलीच राहत आहेत. नदीपात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधणे, भूगर्भातील पाणीसाठा कायम ठेवण्यासाठी विहीर, बोअरवेलचे पुनर्भरण कामावर आवश्यक निधी देऊन जनजागृती करणे याकडे दुर्लक्ष केले जाते. विजेशिवाय पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
वान धरणातील पाण्याचे काय?
आमदार नितीन देशमुख यांनी सातत्याने मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करून वान धरणातील पाणी बाळापूर तालुक्याला मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. परंतु बाळापूर तालुकावासीयांना अद्यापही वान धरणाचे पाणी मिळाले नाही. त्यात तांत्रिक अडचणी आल्यामुळे पाणी मिळू शकले नाही असे समजते. तालुक्याला वान धरणातील पाण्याची प्रतीक्षा आहे.
तालुक्यातील १६ गावांतून पाणीटंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आलेल्या प्रस्तावाच्या कामाचे मूल्यांकन करून कामे मंजूर झाली. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. तालुका टंँकरमुक्त आहे.
-मिलिंद जाधव, अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना, बाळापूर