अंदुरा परिसरात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:17 AM2021-01-04T04:17:21+5:302021-01-04T04:17:21+5:30
प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना कारंजा रमअंतर्गत अंदुरासह परिसरातील दहा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु मागील काही दिवसांपासून परिसरात राष्ट्रीय ...
प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना कारंजा रमअंतर्गत अंदुरासह परिसरातील दहा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु मागील काही दिवसांपासून परिसरात राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना खोदकाम करतेवेळी ही जलवाहिनी फुटली व शेकडो लीटर पाण्याचा वाहून गेले. ही जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम जलवाहिनी फुटल्या दिवसापासून सुरू असून, कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे या जलवाहिनी दुरुस्ती करण्याच्या कामाला विलंब होत आहे. परिणामी परिसरातील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कारंजा रम येथून अंदुरा परिसरातील सोनाळा, कारंजा, नया अंदुरा, हाता, लोणाग्रा, शिंगोली, हातला, निंबा फाटा, आडसूळ इत्यादी गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. कारंजा रम प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना येथे ११ बोअरवेल असून, त्यापैकी ६ बोअरवेल पूर्णपणे आतल्या असून, २ बोअरवेल महामार्गाच्या कामात बाधित झाल्या, तर उर्वरित ३ बोअरवेल वरुण परिसरातील १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पूर्णपणे जीर्ण झाली असून, २ ते ३ किमी अंतरामध्ये ५ ते ६ ठिकाणी गळती लागली आहे. या गळती झालेल्या ठिकाणावरून जागोजागी गटारी तयार झाल्या आहेत. त्यामधून दूषित पाणी जलवाहिनीत जाऊन पाणीपुरवठा दूषित होत आहे. या संदर्भात वेळोवेळी कर्मचार्यांना सांगूनसुद्धा गळती काढण्याच्या कामात येथील कर्मचारी हलगर्जी करीत आहेत. तरी वरिष्ठांनी दखल येथील कर्मचाऱ्यांची कानउघडणी करून परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.