पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:48 PM2019-04-13T13:48:03+5:302019-04-13T13:48:12+5:30
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी देण्यात आले.
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने स्थायी समितीच्या सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही. तथापि, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करुन, टंचाईग्रस्त गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश या सभेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले. मागील सभेच्या इतिवृत्ताला सभेत मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, कृषी सभापती माधुरी गावंडे, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, समितीचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, दामोदर जगताप, डॉ. हिंमत घाटोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वसंत खिल्लारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खांबोरा पाणीपुरवठा योजनेच्या
पंपाची दुुरुस्ती करा!
६४ खेडी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी उचल करण्याचे पंप नादुरुस्त असल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेच्या पंपाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही या सभेत देण्यात आले.
कृषी-पशुसंवर्धन समितीच्या सभेत केवळ इतिवृत्त मंजूर!
गत ८ एप्रिल रोजी तहकूब करण्यात आलेली जिल्हा परिषद कृषी समितीची सभा शुक्रवार,१२ एप्रिल रोजी घेण्यात आली; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता, केवळ मागील सभेचे इतिवृत्त यासभेत मंजूर करण्यात आले. कृषी सभापती माधुरी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, डॉ. हिंमत घाटोळ व संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या सभेतही केवळ मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य अहिल्या गावंडे, माया कावरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.