शेतात शिरले पाणी; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:46+5:302021-07-20T04:14:46+5:30
कवठा : दोन दिवसांपूर्वी कवठा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे नाल्यांना पूर आला होता. अकोट-शेगाव मार्गानजीकच्या शेतात ...
कवठा : दोन दिवसांपूर्वी कवठा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे नाल्यांना पूर आला होता. अकोट-शेगाव मार्गानजीकच्या शेतात पाणी साचल्याने पीक पाण्याखाली आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे मार्गावरील पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
अकोट-शेगाव या महामार्गाचे काम पूर्ण झाले; मात्र ठेकेदाराने मार्गानजीकच्या नाल्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे या मार्गानजीकच्या शेतात पावसाचे पाणी साचत आहे. पावसाचे पाणी साचून शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी ठेकेदाराकडे वारंवार तक्रारी केल्या; मात्र ठेकेदाराने कुठलीच दखल न घेतल्याने कवठा परिसरातील १५ ते २० हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी कवठा, लोहारा शिवारातील शेतकरी विजय नारायण वारकरी, गजानन देशमुख, अवचितराव देशमुख आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
--------------------------
महामार्गाचे काम झाल्यापासून शेतामध्ये पाणी साचत आहे. याबाबत ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही पाण्याची विल्हेवाट न लावल्याने पिके धोक्यात सापडून दुबार पेरणीची वेळ आली आहे.
- विजय नारायण वारकरी, शेतकरी