जलयुक्तची कामे होऊनही पाणीटंचाई
By admin | Published: May 1, 2017 02:48 AM2017-05-01T02:48:31+5:302017-05-01T02:48:31+5:30
बाळापूर तालुक्यात ५२ गावांमध्ये जलयुक्तची झाली कामे
अनंत वानखडे - बाळापूर
बाळापूर तालुक्यातील ५२ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू आहेत. २०१४-१५ पासून जलयुक्त शिवार योजना सुरू झाली. जलयुक्त शिवार योजनेत तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी कामे न झाल्याने योजनेला हरताळ फासून शासकीय योजना कुरण ठरत आहे.
जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना खरिपातील पाऊस खंडित झाल्यास पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकरी नदी-नाल्यावर अडविलेले पाणी पिकांना पंपाद्वारे देण्यासाठी वापरतात; परंतु ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शिवार योजनेचा कुठलाही लाभ होत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या गावातच पाणीटंचाईचे संकट उभे राहत असल्याचे चिन्ह आहे.
२०१४-१५ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत २० गावे २०१५-१६ मध्ये १२ गावे, २०१६-१७ मध्ये २० गावे असे एकूण ५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भूगर्भात पाणी जिरविण्यासाठी पावसाचे पाणी शिवारातच अडविण्यासाठी नाले शासकीय जमिनीवर शेततळे खोदणे, शेतकऱ्याच्या शेतात ढाळीचे बांध बांधणे, विहीर पुनर्भरण, नाला रुंदीकरण, बंधारे, शेततळ्यातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवणे आदी कामांसोबत सिमेंट बंधारे बांधणे यासाठी लघुसिंचन जि. प. बांधकाम विभाग, तालुका कृ षी कार्यालय, जलसंधारण विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग आदी विभागांतर्गत जलयुक्त शिवार योजनेची कामे प्रशासन करीत आहेत. जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागाची खरी गरज आहे; परंतु लोकसहभाग वाढवण्यासाठी कुठलाही प्रयत्न न करता प्रशासकीय अधिकारी कुठल्याही कामाला तांत्रिकदृष्ट्या मंजुरी न घेता भ्रष्टाचाराला पूरक अशी कामे केली जात आहे. अनेक शेततळी बंधारे कोरडीच राहिली. विहीर पुनर्भरणाच्या नावाखाली कामे झाली; परंतु फायदा झालेला नाही. मोरगाव सादीजनमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेची सर्वात जास्त कामे झाली; परंतु तेथे अद्यापही पाणीटंचाई भासत आहे. याबात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे योजनेच्या निकृ ष्ट कामाच्या तक्रारी झाल्या. परंतु चौकशी झाली नसल्याचा आरोप बंडू टेकाडे, खंडूजी लाखे, देवीदास वाघ, हरिभाऊ वाघ यांनी केल्या होत्या. वझेगाव, दधम, शेळद, उरळ खु. लोहारा या गावांतही तीच परिस्थिती आहे. जलयुक्त शिवार योजनेत सर्व कामे यंत्रांनी केली जात असली, तरी खोली, रुंदीकरण कामात निकृ ष्ट दर्जा, प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त बिल काढून भ्रष्टाचाराला पूरक ठरल्याने दोन वर्षांपूर्वीची अनेक ढाळीचे बांध शेततळे, जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक योजनेत भ्रष्टाचारासाठी पायवाटा काढून निकृ ष्ट दर्जाची कामे प्रशासकीय अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्षित करून कामात वाटेकरी होत आहेत. जलयुक्त शिवार योजना पाणीटंचाई निवारण्यासाठी पूरक असली, तरी नियोजनाअभावी, भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून केली नसल्याने योजना भ्रष्टाचाराचे केवळ कुरण ठरणार आहे.
खारपाणपट्ट्यात भीषण पाणीटंचाई
तालुका हा खारपाणपट्ट्याने व्यापला आहे. सिंचन क्षेत्र केवळ पाच टक्के आहे. २०१४-१५ मध्ये घेतलेल्या योजनेतील कामामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढ होत आहे.