कंचनपूर गावात एक महिन्यापासून पाणीटंचाई : ग्रामस्थांना 'झिऱ्या' चा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:36 PM2020-05-26T17:36:23+5:302020-05-26T17:36:42+5:30
झिरे करून त्या झिऱ्याच्या पाण्यावर गावकरी तहान भागवत असल्याचे भीषण दृश्य कंचनपूर गावात पाहण्यास मिळत आहे.
- संतोष गव्हाळे
हातरुण : खारपाणपट्ट्यात असलेल्या कंचनपूर येथे गत महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हातपंपांना खारे पाणी, अशी विदारक स्थिती असून, टँकरही गावात पोहोचत नाहीत. त्यामुळे झिरे करून त्या झिऱ्याच्या पाण्यावर गावकरी तहान भागवत असल्याचे भीषण दृश्य कंचनपूर गावात पाहण्यास मिळत आहे.
अकोला तालुक्यातील कंचनपूर गावाची १,५०० लोकसंख्या असून, गावात सर्व सोयी-सुविधा असताना पिण्यासाठी पाणी नाही. गावातील चार हातपंप असून, त्यांना खारे पाणी आहे. कंचनपूर गावाला काटेपूर्णा येथून पाणीपुरवठा होतो. या योजनेवरील शेवटचे गाव कंचनपूर असल्याने पाणी वेळेवर पोहचत नाही; मात्र गेल्या एका महिन्यापासून कंचनपूर गावात पाणी पोहोचले नसल्याचे उपसरपंच शिवशंकर डिक्कर यांनी सांगितले. गावात जलकुंभ असून, काटेपूर्णा येथून या जलकुंभात काही दिवसांपासून पाणीच पोहोचत नसल्याने गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.
कंचनपूर गावातील नागरिक भर उन्हात हंडा भरणे, पाण्याची कॅन, बैलगाडीने पाणी आणताना दिसून येतात. गावाजवळून वाहणाºया नाल्यात सध्या पाणी नाही. या नाल्याच्या पात्रात गावकऱ्यांनी पाच ते सहा झिरे केलेले आहेत. या झिºयात पाणी जमा झाले की ग्लासाने हंडा भरल्या जातो. एक हंडा भरण्यासाठी बराच वेळ लागतो. रेकॉर्ड ब्रेक उन्हात ग्रामस्थ झिºयाजवळ पाणी भरताना दिसून येतात. या समस्येकडे लक्ष देण्यास लोकप्रितनिधी आणि अधिकाºयांना वेळ नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. झिºयाच्या पाण्यामुळे ग्रामस्थांना पोटाचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून ग्रामपंचयातने जिल्हा परिषद प्रशासनाला ठराव दिला आहे; मात्र अधिकाºयांच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांची पाण्यासाठी भर उन्हात पायपीट सुरू आहे. कंचनपूर येथील पाणीटंचाई दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी विनोद चोरे, कविश गवाळे, आनंद गावंडे, आनंद चोरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. कंचनपूर गावातील पाणीटंचाईवर उपाययोजना करताना मुहूर्ताची वाट पाहू नका, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांनी केली आहे.