जलवाहिनीला गळती लागल्याने तीन गावात पाणीटंचाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:20+5:302020-12-09T04:14:20+5:30
कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजनेद्वारे शिंगोली, मालवाडा, लोणाग्रा आणि हातला गावांना पाणी पुरवठा केला जातो. हातरुण गावानजीक असलेल्या नाल्यावरील ...
कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजनेद्वारे शिंगोली, मालवाडा, लोणाग्रा आणि हातला गावांना पाणी पुरवठा केला जातो. हातरुण गावानजीक असलेल्या नाल्यावरील पूल पुराच्या पाण्यात कोसळला होता. त्यामुळे हातरुण ते लोणाग्रा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांनी बांधकाम विभागाकडे नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली होती. कोसळलेल्या पुलाचे बांधकाम काही दिवसांपासून सुरू आहे. या पुलाच्या बाजूने मालवाडा, लोणाग्रा आणि हातला या तीन गावांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी आहे. पुलाचे बांधकाम करताना ही जलवाहिनी फुटली होती. त्यानंतर नव्याने जलवाहिनी पुलाच्या एका बाजूने टाकण्यात आली; मात्र या जलवाहिनीला वारंवार गळती लागल्याने हजारो लीटर पाणी वाहून गेले. त्यामुळे मालवाडा, लोणाग्रा आणि हातला गावात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.
मालवाडा, लोणाग्रा आणि हातला गावाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने पाण्याचा अपव्यय होत असून, पुलाच्या बाजूने असलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे येणे-जाणे करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हातरुण गावानजीक असलेल्या पुलाच्या एका बाजूने जाणारी जलवाहिनी ही खोदकाम करून लोखंडी पाइपद्वारे टाकण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर, मालवाडा माजी सरपंच गणेश आढे, लोणाग्रा माजी सरपंच निर्मला सोनोने, हातला ग्रामपंचायतच्या माजी सदस्या छाया कसुरकार, संतोष गव्हाळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो: