धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 03:20 PM2019-07-30T15:20:59+5:302019-07-30T15:21:04+5:30
अकोला: अर्धा पावसाळा संपला; पण दमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे.
अकोला: अर्धा पावसाळा संपला; पण दमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. उमा व निर्गुणा या दोन धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. अकोल्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ३.५ टक्के साठा शिल्लक आहे. मागील आठ दिवसांपासून हा साठा स्थिर असला तरी ३५ ते ४० दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात बार्शीटाळी तालुक्यातील महानचे काटेपूर्णा व तेल्हारा तालुक्यातील वान ही दोन मोठी धरणे आहेत. तर तीन मध्यम स्वरू पाची धरणे आहेत. यात मूर्तिजापूर तालुक्यातील उमा तसेच घुंगशी बॅरेज, पातूर तालुक्यातील मोर्णा व निर्गुणा धरण आहे. बार्शीटाकळी तालुक्यात दगडपारवा प्रकल्प आहे. तथापि, यातील निर्गुणा व उमा धरण शून्य टक्के असून, घुंगशी बॅरेजमध्ये २.७८ टक्के साठा आहे. मोर्णा धरणात १०.४४ टक्के जलसाठा आहे. वान धरणात २६.९९ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या धरणातून यावेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान, काटेपूर्णा धरणात जलपातळी मागील आठ दिवसांपासून स्थिर आहे. २५ ते २६ जुलैपासून पाऊस सुरू झाल्यानंतर पातळीत ०.१ दोन टक्क्यांचा फरक पडला. मागील आठ ते दहा दिवसाची टक्केवारी बघितल्या २० जुलै रोजी काटेपूर्णा धरणात ३.४७ टक्के जलसाठा होता. २६ जुलै ते २८ जुलैपर्यंत हा साठा ३.९ टक्के स्थिर होता. २९ जुलै रोजी मात्र यात ०.४ टक्के घट झाली. येत्या ३० व ३१ रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे; परंतु हा इशारा केवळ किरकोळ ठिकाणी असल्याने अकोलेकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचे चित्र बघता महापालिका प्रशासनाने मृत साठा उचलण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे असून, नियोजन करण्याची गरज आहे.
२००५ मध्ये केला होता मनपाने प्रस्ताव
२००४-०५ मध्ये उद्भवलेल्या भीषण पाणी टंचाईनंतरअकोला शहराची कायमची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्तांनी या दोन्ही धरणातून पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. अप्पर वर्धा धरणाची जलवाहिनी कुरू मपर्यंत असल्याने येथून सहज जलवाहिनी टाकता येऊ शकते.