पाण्याच्या चोरीला महापालिकेचा लगाम; नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:31 PM2019-01-18T15:31:49+5:302019-01-18T15:32:06+5:30

अकोला: महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी करण्याच्या प्रकाराला मनपा प्रशासनाने कायमस्वरूपी लगाम लावला आहे.

water stolen municipal corporation; Complete the work of a new pipeline | पाण्याच्या चोरीला महापालिकेचा लगाम; नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण

पाण्याच्या चोरीला महापालिकेचा लगाम; नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण

Next

अकोला: महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी करण्याच्या प्रकाराला मनपा प्रशासनाने कायमस्वरूपी लगाम लावला आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत बार्शीटाकळीच्या बायपास परिसरात सव्वातीन किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अकोलेकरांच्या हक्काच्या पाण्यावर बार्शीटाकळीत डल्ला मारला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने २०१३ मध्ये स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले होते, हे विशेष.
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी व २५ एमएलडीचे दोन प्लांट कार्यरत आहेत. अकोलेकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथून अकोला शहरापर्यंत ९०० व ६०० व्यासाच्या जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहे. त्यावेळी तत्कालीन बार्शीटाकळी ग्रामपंचायत क्षेत्रातून जलवाहिनीचे जाळे असल्याने ग्रामपंचायतच्या विनंतीवरून मनपाच्यावतीने ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात होता. त्या बदल्यात ग्रामपंचायतकडून नियमित पाणीपट्टी जमा करणे बंधनकारक असताना अनेकदा तत्कालीन ग्रामपंचायतने पैसे भरण्यास असमर्थता दर्शविली. बार्शीटाकळी शहराच्या मध्य भागात जलवाहिनी असल्यामुळे संबंधित नागरिकांनी जलवाहिनीला ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची खुलेआम पळवापळवी सुरू केली होती. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होऊन जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत होता. तत्कालीन ग्रामपंचायत मनपाकडे पाणीपट्टीचा भरणा करीत नसल्याचे पाहून अनेकदा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला; परंतु ग्रामस्थांनी जलवाहिनीला फोडून पाण्याचा अवैध वापर सुरू ठेवल्याचे चित्र होते. यावर उपाय म्हणून बार्शीटाकळीमधील जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा बंद करून शहराबाहेरील बायपास परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव मनपाच्या जलप्रदाय विभागाने तयार केला. या प्रस्तावानुसार ‘अमृत’ योजनेंतर्गत बार्शीटाकळीतील बायपास परिसरात सव्वातीन किलोमीटर जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले. त्यामुळे पाण्याचा चोरीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

‘टॅपिंग’द्वारे शेतीसाठी वापर!
तत्कालीन बार्शीटाकळी ग्रामपंचायतच्या कालावधीत ग्रामस्थांनी मनपाच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी अवैध ‘टॅपिंग’ केले होते. काही महाभागांनी ‘टॅपिंग’द्वारे चक्क शेतापर्यंत जलवाहिनी टाकून त्या माध्यमातून पिक ांना पाणी पुरवठा केला जात असल्याचे धक्कादायक चित्र २०१३ मध्ये ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले होते.

तत्कालीन आयुक्तांची धडाकेबाज कारवाई
२०१३ मध्ये बार्शीटाकळी गावात मनपाच्या जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आल्यानंतर मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोळीकर यांनी गावातील अवैध कनेक्शन तोडण्याची धडाकेबाज कारवाई केली होती.
 

 

Web Title: water stolen municipal corporation; Complete the work of a new pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.